राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 26 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थितांसमोर जोरदार भाषण केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांनी सांगितले की, “भाषण अनेकांनी आटोपते घेतले आहे घेतलं, कारण आज संध्याकाळी सात वाजता पवार साहेब आणि मला पंतप्रधान मोदीजींनी ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात आयोजित कार्यक्रमासाठी दिल्लीला आमंत्रित केले आहे. त्यामुळे आम्हाला दोन वाजताच दिल्लीची फ्लाइट पकडावी लागणार आहे.”
सुप्रिया सुळे यांनी शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला. “26 वर्षांपूर्वी शिवाजी पार्कवरील तो सोहळा आजही मला आठवतो. त्यावेळी पहिले प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ होते. सहा महिन्यांत आम्ही सत्तेत आलो आणि सलग 15 वर्षे सत्तेवर होतो. ही आमची कामगिरी संपूर्ण नेतृत्व आणि कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे,” असे त्या म्हणाल्या. सुळे यांनी दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची आठवण काढताना भावूक झाल्या. “त्यांची आठवण न काढता कोणताही कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही,” असे त्यांनी नमूद केले.
वैयक्तिक अनुभव व संघर्ष
“मी चार वेळा खासदार झाले, त्यामागे पक्षातील सहकाऱ्यांचे योगदान आहे, जे मी कधीच विसरणार नाही. हे माझे संस्कार आहेत,” असे त्या म्हणाल्या. त्यांनी 2019 मध्ये पावसात झालेल्या सभेची आठवण सांगितली जिथे शरद पवार हे पावसात भिजून भाषण करत होते. त्याचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे निवडणुकीत विजय मिळाला, महाराष्ट्राने त्यावेळी ताकद दाखवून दिली. “दोन जुलैचा दिवस मी विसरू शकत नाही. जेव्हा बहुतेक नेते दुसऱ्या गटात गेले, त्यावेळी पत्रकारांनी विचारले की आता पक्षाचा चेहरा कोण? तेव्हा पवार साहेबांनी हात वर करून ‘शरद पवार’ असे उत्तर दिलं. हा आत्मविश्वासच आमचं बळ आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
सामान्यांचा मुद्दा आणि धोरणात्मक भूमिका
सुळे यांनी स्पष्ट केलं की, “सत्ता हे अंतिम ध्येय नसून, सर्वसामान्य जनतेची सेवा हे आमचं ध्येय आहे.” त्यांनी लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी प्रभावी भूमिका बजावल्याचे उदाहरण देत,लोकसभेत पक्षाचे भाषण आणि मागण्या नेहमीच प्रभावी राहिल्या असल्याचं सांगितलं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी नुकत्याच झालेल्या दिल्लीतील सत्राची माहिती दिली, जिथे इन्कम टॅक्सवरील नवीन विधेयकावर विरोधी पक्षातील असूनही राष्ट्रवादी काँग्रेसला मत मांडण्याची संधी मिळाली. “नेशन वन इलेक्शन या विषयावरही पक्ष महत्त्वाची भूमिका बजावेल,” ऑपोझिशनमध्ये असलो तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा डिसिजन मेकिंग मध्ये असतो असे त्या म्हणाल्या.
शेतकरी आणि महिला मुद्द्यांवर ठाम भूमिका
लाडकी बहीण योजना योजना विना अडथळा राबवावी व शेतकऱ्यांची कर्जमाफी यावर भाष्य करताना त्या म्हणाल्या, “सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी तातडीने केली पाहिजे. ही राजकीय मागणी नाही, परिस्थिती गंभीर आहे.” वैष्णवी हगवणे प्रकरणाबाबतही त्यांनी तीव्र प्रतिक्रिया देताना, “हुंडा मुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारने पावलं उचलावीत,” अशी मागणी केली. सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी पक्षाच्या धोरणात्मक मजबुतीसाठी एक प्रस्ताव मांडला यावेळी त्या म्हणाल्या की, “दर महिन्याला दोन दिवसांचे फ्री वर्कशॉप आयोजित करावेत, ज्यात सर्व कार्यकर्ते सहभागी होऊ शकतील. यामुळे विचारधारेची बैठक मजबूत होईल,” असे त्यांनी नमूद केले. सध्याच्या सत्ताधारी नेत्यांवर टीका करताना त्या म्हणाल्या, “राजा जर हेलिकॉप्टरने फिरत असेल, तर प्रजेचं दुःख कसं समजणार?”