थोडक्यात
एमपीएससीने ही परीक्षा पुढे ढकलली
शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द
रविवारी होणारी परीक्षा ही आता 9 नोव्हेंबर रोजी होणार
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीची प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी झाली होती. त्यानुसार एमपीएससीने (MPSC Exam) ही परीक्षा पुढे ढकलली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 येत्या रविवारी (28 सप्टेंबर)ला होणार होती. आता ही परीक्षा नऊ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. (MPSC joint preliminary exam postponed)
आता परीक्षा दीड महिन्याने होणार
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा येत्या 28 सप्टेंबरला होणार होती. ही परीक्षा 37 जिल्ह्या केंद्रावरील 524 उपकेंद्रावर घेण्यात येणार होती. परंतु राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यातील विविध गावांचा, तालुक्यांचा एकमेंकाशी संपर्क तुटलेला आहे. तसेच राज्यातील हवामान खात्याने पुढील काही दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. येत्या तीन दिवसांतही मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे परीक्षार्थ्यांनी परीक्षा देण्यास अडचणी येणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला परीक्षा पुढे ढकलण्याबाबत पत्र दिले आहे. त्यामुळे येत्या रविवारी होणारी परीक्षा ही आता 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
शहरात तयारी गावाकडे शेत उद्धवस्त
स्पर्धा परीक्षा देण्यासाठी मराठवाड्यातील अनेक जण तयारी करतात. विशेष म्हणजे पुणे शहरात राहून ते अभ्यास करतात. परंतु गावाकडे शेती उद्धवस्त झालेली आहे. या परिस्थितीत परीक्षा देणाऱ्यांची मानसिकता राहणार नाही. त्यामुळे एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणीही परीक्षार्थ्यांकडून झालेली आहे. तसेच अनेक राजकीय नेत्यांनी ही परीक्षा सरकारने पुढे ढकलेली पाहिजे, अशी मागणी केली होती. त्यामुळे ही परीक्षा दीड महिन्यानंतर घेतली जाणार आहे.