महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार 26, 27 आणि 28 एप्रिल 2025 रोजी घेण्यात येणार आहे. आयोगाने यासंदर्भातील माहिती अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली असून, परीक्षा निश्चित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अर्ज प्रक्रियेत अडचण येणाऱ्या उमेदवारांसाठी आयोगाने सुविधा केंद्र आणि ई-मेलद्वारे मदतीची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.
बुधवारी, 9 एप्रिल 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी 7,732 उमेदवारांनी आपले ऑनलाइन अर्ज यशस्वीपणे सादर केले आहेत. मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या एकूण 7,970 उमेदवारांपैकी काही उमेदवार अजूनही अर्ज सादर करू शकलेले नाहीत. यामुळे आयोगाकडून अर्ज करण्यासाठी पुरेशी सुविधा दिली जात असतानाही काही उमेदवारांनी विलंब का केला, याबाबत प्रश्न निर्माण होत आहेत.
दरम्यान, काही उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करताना प्रवर्ग (category) बदलण्याचा पर्याय उपलब्ध नसल्याची तक्रार नोंदवली आहे. या कारणामुळे काही उमेदवारांनी अर्ज सादर करण्यात अडथळा येत असल्याचे सांगितले आहे. यासोबतच, अर्ज प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणींचा हवाला देत, परीक्षेची तारीख पुढे ढकलावी आणि अर्ज करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी देखील काही उमेदवारांकडून करण्यात आली होती.
मात्र, आयोगाने यावर स्पष्ट भूमिका घेतली असून, विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्याही अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यास उशीर करू नये, असा इशारा आयोगाने दिला आहे.
एमपीएससीच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. परीक्षेला फक्त अर्ज सादर केलेले आणि पूर्वपरीक्षेत पात्र ठरलेले उमेदवारच बसू शकतील. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करून आपली पात्रता निश्चित करावी, असे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.