ताज्या बातम्या

Dharavi Redevelopment : मुलुंड मिठागराची जमीन 'धारावी'साठी; अन्य जमिनींवरही शिक्कामोर्तब

धारावीतील अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी मुलुंडमधील ५८.५ एकर जागा धारावी पुनर्वसन प्रकल्पास (डीआरपी) आणि पर्यायाने अदानी समूहाला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • मुलुंडमधील जागा धारावीसाठीच

  • ५८ पैकी ४२ एकर मिठागराच्या जागेचा विकास

  • डीआरपी विशेष नियोजन प्राधिकरण

धारावीतील अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी मुलुंडमधील ५८.५ एकर जागा धारावी पुनर्वसन प्रकल्पास (डीआरपी) आणि पर्यायाने अदानी समूहाला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता या ५८.५ एकर जागेपैकी ४२.५१ एकरांवरील मिठागराच्या जागेच्या विकासासाठी डीआरपीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय नगर विकास विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला. त्यामुळे आता ही जागा धारावीसाठी वापरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

धारावी पुनर्विकासाअंतर्गत पहिल्यांदा अपात्र रहिवाशांचेही पुनर्वसन केले जाणार आहे. त्यांना मुलुंड, कुर्ला, कांजूरमार्ग आणि अन्य ठिकाणी भाडेतत्त्वावरील गृहनिर्माण योजनेत सामावून घेण्यात येणार आहे. यासाठी घरांची निर्मिती करण्यासाठी डीआरपीकडून मुंबईतील विविध ठिकाणच्या जागेची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. त्यानुसार सरकारकडून जागा दिल्या जात आहेत. यातीलच एक जागा ही मुलुंड येथील केळकर महाविद्यालयाजवळील ५८.५ एकरची मिठागराची जागा.

ही जागा धारावीसाठी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुढील कार्यवाही करत ही जागा डीआरपीच्या ताब्यातही देण्यात आली आहे. ही जागा डीआरपीला केवळ ३१९ कोटी रुपयांत देण्यात आली आहे. ही जागा देण्याचा निर्णय झाल्यापासून मुलुंडवासीयांचा जागा धारावीसाठी देण्यास तीव्र विरोध आहे. यासाठी मुलुंडवासी अनेकदा रस्त्यावरही उतरले आहेत. ॲड. सागर देवरे यांनी मिठागरांच्या जागा धारावीकरांसाठी वापरण्याच्या निर्णयावर आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळत राज्य सरकार आणि डीआरपीला दिलासा दिला.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाला ॲड. देवरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ५८.५ एकरांपैकी ४२.५१ एकर असे असताना आता मुलुंडमधील जागेच्या विकासाचा मार्ग राज्य सरकारने मोकळा केला आहे. देवरे यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. ही जागा धारावीसाठी देण्यास मुलुंडवासीयांचा प्रचंड विरोध असताना, या जागेच्या वापरामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार असतानाही सरकारने अखेर ही जागा धारावीसाठी देण्याच्या दृष्टीने अखेरची आणि महत्त्वाची प्रक्रिया पार पाडली आहे. आमचा याविरोधातील लढा सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया देवरे यांनी दिली.

१६ एकरबाबत उल्लेख नाही

नगरविकास विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध करत डीआरपीची मुलुंडमधील मिठागराच्या ४२.५१ एकर जागेसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. शासन निर्णयानुसार ४२.५१ एकर जागेसाठी डीआरपी विशेष नियोजन प्राधिकरण असणार आहे. ५८.५ एकर जागेपैकी ४२.५१ एकर जागेसाठी डीआरपीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरित जागेबाबत शासन निर्णयात कोणताही उल्लेख नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा