Aarey Crime News : मुंबईमध्ये आरे परिसरामधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे . एका वृद्ध आजीला तिच्या नातवाने चक्क कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे, त्यावृद्ध महिलेला त्वचेचा कर्करोग असल्याने तिच्या नातवानेच हे कृत्य केल्याचे समोर आले आहे . सध्या त्या वृद्ध महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अश्या घटनांमुळे सध्या नात्यांमधील समजुदारपणा कुठेतरी लोप पावत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
यशोदा गायकवाड असे त्या वृद्ध महिलेचे नाव असून ही महिला आपल्या नातवासोबत मालाड परिसरामध्ये राहते. आरे कॉलनीमधील रस्त्यावर सकाळी साडेआठच्या सुमारास काही नागरिकांना एक महिला कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये पडलेली दिसली. आजूबाजूच्या नागरिकांनी त्वरीत जवळच्या पोलिस स्टेशनला याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेत त्या वृद्ध महिलेला तिथून उचलले आणि रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले. मात्र इथे ही माणुसकीचा अभाव पाहायला मिळाला.
दोन ते तीन रुग्णालयांनी या वृद्ध महिलेवर उपचार करण्यास नकार दिला. शेवटी कूपर रुग्णालयात त्या महिलेला दाखल केले गेले. सध्या त्या महिलेवर उपचार सुरु आहेत. याबाबत पोलिसांनी त्या महिलेची चौकशी केली असता तिने तिच्या घराचा पत्ता त्यांना सांगितला. त्याबरोबर पोलिसांनी त्या पत्त्यावर जाताच घर बंद असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्या महिलेला त्वचेचा कॅन्सर आहे. त्या आजाराच्या उपचारासाठी नातवाकडे पैसे नव्हते. म्हणून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
म्हातारपणामध्ये आजी आजोबांना सर्वात जास्त आपली नातवंडे प्रिय असतात. किंबहुना या वयात त्यांना नातवंडे सर्वात जवळची वाटतात. आजी आजोबा आणि नातवंडे असं एक प्रकारचे विश्वासाचे समजूतदारपणाचे नाते निर्माण झालेले असते. मात्र याच पवित्र नात्याला आज एका नातवाने काळिमा फासत हे क्रूर कृत्य केले आहे. याप्रकरणी पोलीस सध्या त्या नातवाचा शोध घेत आहेत.