वैद्यकीय मदतीच्या बहाण्याने 45 वर्षीय महिलेला सुमारे 19 लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली मुंबई सायबर पोलिसांनी दिल्लीस्थित युट्यूबर पीयुष कत्यालला अटक केली आहे. युट्यूबवर प्रँक व्हिडिओ बनवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या पीयुष कत्यालचे सोशल मीडियावर 5 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने त्याचे कंटेंट पाहिल्यानंतर सुमारे 4-5 महिन्यांपूर्वी त्याच्या अकाउंटला फॉलो करायला सुरुवात केली. सोशल मीडियावर कमेंट्सद्वारे दोघांचे संपर्क झाले आणि अखेर फोन नंबरची देवाणघेवाण झाली.
कालांतराने, पीयुषने विविध वैद्यकीय मदतीचे कारण देत पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्या महिलेने, त्याची परिस्थिती खरी असल्याचे समजून, मदत केली. तथापि, त्याच्या पैशाच्या मागण्या वारंवार वाढू लागल्या. जेव्हा तिने अधिक पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा कत्यालने त्यांच्या चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर करून तिला बदनाम करण्याची धमकी दिली.
अखेर, महिलेने उत्तर सायबर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. तक्रारीवरून कारवाई करत पोलिसांनी एफआयआर नोंदवला आणि दिल्ली येथून कत्यालला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. ज्यांनी पुढील चौकशीसाठी पीयुषला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा