संपूर्ण महाराष्ट्रभर हिंदी भाषेची सक्ती या विषयावरून राजकारण तापलेले असताना आणि त्या विरुद्ध मनसे कार्यकर्त्यांची धडक कारवाई सुरु असताना मुंबईमधील भांडुप मध्ये अजबच प्रकार पाहायला मिळाला आहे. भांडुपमधील एका शाळेत चक्क पंजाबी भाषेची पुस्तके वाटली गेली. आणि ही माहिती मनसे कार्यकर्त्यांना मिळताच एकच गोंधळ उडाला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ त्यावर कारवाई करत पंजाबी भाषेची पुस्तके परत घेण्याची जोरदार मागणी केली.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक विषय खूपच जोर धरून आहे तो म्हणजे हिंदी भाषेची सक्ती . या एका गोष्टीवरून महाराष्ट्रामध्ये मनसे पक्ष सरकारला प्रचंड विरोध करताना पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी यासंदर्भात आंदोलने , धडक कारवाई केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर काल मनसेनेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला हिंदी भाषेच्या सक्तीविरोधी लढा हा कायम असल्याचे सांगितले. मात्र असे असताना भांडुप मधील गुरुनानक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना चक्क पंजाबी भाषेची पुस्तके वाटण्यात आली.
याची मनसे कार्यकर्त्यांना माहिती मिळताच मनसे कार्यकर्ते त्या शाळेत पोहोचले आणि तिथे जाऊन सर्व पंजाबी भाषेची पुस्तके परत घेण्याची जोरदार मागणी केली.अखेर अनेक वाटाघाटींनंतर शाळा प्रशासनाने यावर तोडगा काढत ती सर्व पुस्तके परत घेण्याचे आश्वासन दिले. मात्र या घटनेमुळे भांडुप परिसरामध्ये काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. शाळेच्या बाहेर ही कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यासंदर्भात बॅनर ही भांडुप परिसरात लावण्यात आले होते.
याचे पडसाद भांडुप परिसरात पाहायला मिळाले. भांडुपमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी पुस्तकांची विक्री करणाऱ्या दुकानदारांना पहिली ते चौथीपर्यंतचे हिंदीचे पुस्तक आल्यास त्यांची विक्री करू नका अन्यथा ती पुस्तके आम्ही जाळून टाकू असा इशारा ही यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी दिला. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती नको असा विचार याआधी ही राज ठाकरे यांनी मांडला होता मात्र आता जर हिंदी सक्ती थांबवली नाही तर त्याचे राज्यभरात वाईट पडसाद दिसतील असा इशारा मनसे पक्षाने दिला आहे .