मुंबई पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईकर उत्साहात तयारी करत आहेत. थर्टी फर्स्टच्या रात्री मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडत असल्याने त्यांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि विनासायास व्हावा, यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. बेस्ट उपक्रम आणि मुंबई मेट्रो प्रशासनाने रात्रभर परिवहनसेवा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRC) मेट्रो-३ अर्थात अॅक्वा लाईन रात्रभर सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आरे ते कफ परेड दरम्यान धावणारी ही मेट्रो ३१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १०.३० वाजल्यापासून सुरू होणार असून १ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५.५५ वाजेपर्यंत अखंडपणे धावणार आहे. त्यानंतर सकाळी ५.५५ वाजल्यापासून नेहमीप्रमाणे नियमित मेट्रो सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या सकाळपासून सुरू झालेली मेट्रो सेवा थेट १ जानेवारीच्या पहाटेपर्यंत सलग उपलब्ध राहणार आहे.
या विशेष सेवेचा फायदा प्रामुख्याने समुद्रकिनाऱ्यावर नववर्ष साजरे करणाऱ्या मुंबईकरांना होणार आहे. मध्यरात्री घरी परतताना टॅक्सी किंवा रिक्षेसाठी प्रतीक्षा करावी लागणार नसून, महिला, कुटुंबीय आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा अधिक सुरक्षित ठरणार आहे. मात्र, प्रवाशांनी मेट्रोतील नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे.
दुसरीकडे, बेस्ट उपक्रमानेही थर्टी फर्स्टसाठी विशेष तयारी केली आहे. गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई खाडी, माहीम चौपाटी यांसारख्या गर्दीच्या समुद्रकिनारी जाणाऱ्या प्रवाशांसाठी २५ जादा बसेस चालवण्यात येणार आहेत. बुधवारी रात्री १० वाजल्यापासून रात्री १२.३० वाजेपर्यंत बस मार्ग क्रमांक C-8.6, 203, 231 तसेच वातानुकूलित बस मार्ग A-21, 9-112, 9-116, A-247, A-272, A-294 वर अतिरिक्त फेऱ्या धावणार आहेत.
याशिवाय, ‘हेरिटेज टूर’ बससेवाही बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून गुरुवारी नववर्षाच्या पहाटेपर्यंत प्रवासी प्रतिसादानुसार चालवली जाणार आहे. एकूणच, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतील परिवहन व्यवस्था सज्ज झाली असून, नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेत सुरक्षित आणि आनंदात नववर्ष साजरे करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.