मुंबईमधील सुप्रसिद्ध लीलावती हॉस्पिटल संबंधित एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टच्या लिलावती रुग्णालयात गेल्या 20 वर्षांत 1250 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. या प्रकरणी ट्रस्टने 17 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचप्रमाणे लीलावती रुग्णालयामध्ये काळी जादू केली जात असल्याचेही समोर आले आहे.
लीलावती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक आणि माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी याबद्दल माहिती दिली आहे. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी सांगितले की, "ट्रस्टच्या काही माजी कर्मचाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी तक्रार केली होती. रुग्णालयाचे ट्रस्टी प्रशांत मेहता आणि त्यांची आई चारू मेहता हे ज्या कार्यालयामध्ये बसतात त्या ठिकाणी काळ्या जादूचे विधी केले जात होते. त्यावेळी ऑफिसचा मजला खोदला असता त्यामध्ये मानवी अवशेष, तांदूळ, मानवी केस आणि काही काळ्या जादूचे साहित्य असलेले आठ भांडी पुरलेली आढळली. या सगळ्याची पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. त्यानंतर वांद्रे न्यायालयात धाव घेतली असता मॅजिस्ट्रेट स्वतः बीएनएसएसच्या कलम 228 अंतर्गत या प्रकरणाची चौकशी करत आहेत", असे माजी पोलिस आयुक्तांनी सांगितले.
याचबरोबर लीलावती रुग्णालयामध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचेही समोर आले आहे. फॉरेन्सिक ऑडिटमध्ये ट्रस्टच्या निधीचे परदेशातील खात्यांमध्ये बेकायदेशीरपणे हस्तांतरण, कायदेशीर खर्चाच्या रूपात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार, फसव्या गुंतवणूका आणि आरोपींकडून मोठ्या प्रमाणात लाचखोरी असे गंभीर गैरव्यवहार झाल्याचे दिसले.