(Mumbai Metro Line 4) मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासात आणखी एक महत्वाची भर पडली आहे. मुंबई मेट्रो लाईन ४ प्रकल्पात भांडुप ते सोनापूर जंक्शनदरम्यान एका रात्रीत ५६ मीटर लांबीचा आणि ४५० टन वजनाचा स्टील स्पॅन यशस्वीपणे बसवण्यात आला. आव्हानात्मक हवामान आणि व्यस्त वाहतूक व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर केलेली ही कामगिरी MMRDA साठी मोठं यश मानलं जात आहे. या टप्प्यानंतर मेट्रो लाईन ४ च्या कामाची एकूण प्रगती आता ८४.५% वर पोहोचली आहे. यावर एमएमआरडीएच्या अधिकृत एक्स अंकाऊटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. 
एक्स पोस्टमध्ये लिहिले आहे की, केवळ एका रात्रीत MMRDA च्या अभियंता पथकानं भांडुप ते सोनापूर (GMLR) जंक्शनवर ५६ मीटर लांबीचा आणि ४५० टन वजनाचा स्टील स्पॅन यशस्वीपणे बसवला. वडाळा ते कासारवडवली या मुंबई मेट्रो लाईन ४ च्या कामाचा हा महत्त्वपूर्ण टप्पा असून, आता प्रकल्पाची एकूण प्रगती ८४.५% वर पोहोचली आहे.
अवकाळी पावसासारख्या आव्हानात्मक परिस्थितीत सुद्धा अत्यंत बारकाईनं आणि अचूकपणे हे काम पार पाडण्यात आलं. दोन गर्डर असलेला हा स्टील स्पॅन ९ उच्च क्षमतेच्या क्रेन्स, २ मल्टी-अॅक्सल पुलर्स आणि १०० हून अधिक कुशल तंत्रज्ञांच्या साहाय्यानं बसवण्यात आला. यादरम्यान मुंबईच्या वाहतुकीत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची देखील संपूर्ण खबरदारी बाळगण्यात आली.
ही रात्रीची कामगिरी म्हणजे मुंबईला वेगवान, सुरक्षित आणि स्मार्ट प्रवासाच्या आणखी एका पायरीवर नेणारी उल्लेखनीय झेप आहे. #EngineeringExcellence आणि #MumbaiInMinutes या भावनेचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ही कामगिरी आहे. 
या कार्याच्या यशस्वी आणि सुरक्षित पूर्ततेसाठी मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य करणाऱ्या सर्व सरकारी यंत्रणा, विशेषतः ट्रॅफिक पोलीस विभाग, BMC आणि MSEDCL यांच्या अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार! आधुनिक मुंबईची घडवणूक - एका रात्रीत स्टील स्पॅन बसवून प्रगती सुसाट!