आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चांना अखेर ठोस आकार येताना दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई महापालिका निवडणूक 2026 साठी महायुतीतील भाजप–शिवसेनेचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास अंतिम झाला आहे. या नव्या सूत्रानुसार, मुंबई महापालिकेच्या एकूण 227 जागांपैकी भाजप 140 तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना 87 जागा लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे.
महत्त्वाचं म्हणजे, महायुतीतीलच अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे मुंबईत भाजप आणि शिवसेना मिळून सर्व 227 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. या जागावाटपाच्या सूत्रावर अधिकृत शिक्कामोर्तब कधी होणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
यापूर्वी झालेल्या पहिल्या बैठकीत भाजपकडून शिंदे गटासाठी केवळ 52 जागा देण्याची तयारी दर्शवण्यात आली होती. मात्र, ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीनंतर मुंबईतील राजकीय समीकरणं बदलली आणि त्यानंतर भाजपने शिवसेनेला अधिक जागा देण्याची भूमिका घेतल्याची चर्चा आहे. तरीही, या नव्या फॉर्म्युलाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून अद्याप एकाही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून ‘वेट अँड वॉच’ धोरण अवलंबण्यात आल्याची चर्चा आहे. तसेच ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर आणि पनवेल या महापालिकांतील जागावाटपाचा पेचही अद्याप कायम आहे. मात्र, येत्या एक-दोन दिवसांत या सर्व ठिकाणचं जागावाटप निश्चित होईल, असा दावा भाजपमधील सूत्रांकडून केला जात आहे.
मुंबई महानगपालिका 2026 साठी निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशन- 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
नामनिर्देशन पत्राची छाननी- 31 डिसेंबर
उमेदवार मागे घेणे- 2 जानेवारी 2026 पर्यंत
अंतिम यादी आणि चिन्ह- 3 जानेवारी 2026
मतदान- 15 जानेवारी 2026
मतमोजणी/निकाल-16 जानेवारी 2026
2017 चे पक्षीय बलाबल- 227 नगरसेवक
शिवसेना- 84
भाजपा- 82
काँग्रेस- 31
राष्ट्रवादी काँग्रेस- 9
मनसे- 7
समाजवादी पक्ष- 6
एमआयएम- 2
अपक्ष- 5