ताज्या बातम्या

BMC Election : मुंबई महापालिका निवडणूक, महायुतीत 207 जागांवर एकमत, शिवसेनेच्या वाट्याला 79 जागा

शिवसेनेचे (शिंदे गट) नेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले की, महायुती कशी जिंकणार याचे सविस्तर नियोजन सुरू आहे. गरज भासल्यास उमेदवारांमध्ये बदलही केले जातील.

Published by : Varsha Bhasmare

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC Election) निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच महायुतीने आपली रणनीती अधिक आक्रमक केली आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात शनिवारी पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत 227 पैकी 207 जागांवर एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये भाजप 128 तर शिवसेना 79 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र उर्वरित 20 जागांबाबत अजूनही चर्चा सुरू आहे.

मुंबईतील रंगशारदा नाट्यगृहात झालेल्या या संयुक्त बैठकीला भाजपचे आमदार आशिष शेलार, अमित साटम तसेच शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आणि खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते. बैठकीनंतर सर्व नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी रवाना झाले. माध्यमांशी बोलताना अमित साटम यांनी सांगितले की, जागावाटपासोबतच जनसभा नियोजन, संयुक्त प्रचार सभा आणि उमेदवार निवडीवर सविस्तर चर्चा झाली आहे.

काही जागांवर समोरचा उमेदवार पाहून कोणता पक्ष लढणार याचा निर्णय घेतला जाईल, असेही साटम यांनी स्पष्ट केले. मुंबईचा विकास थांबवणाऱ्या शक्तींना पराभूत करण्यासाठी महायुती पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा त्यांनी केला. उर्वरित 20 जागांबाबत राष्ट्रीय पातळीवर चर्चा करून लवकरच तोडगा काढला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना साटम म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांपासून उद्धव ठाकरे दूर गेले आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पक्षात प्रवेश दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शिवसेनेचे (शिंदे गट) नेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले की, महायुती कशी जिंकणार याचे सविस्तर नियोजन सुरू आहे. गरज भासल्यास उमेदवारांमध्ये बदलही केले जातील. दोन्ही पक्षांमध्ये सन्मानजनक जागावाटप होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या १ किंवा २ तारखेपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या संयुक्त प्रचार सभांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा