मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर आता प्रचारसभांसाठी दादरचे शिवाजी पार्क मैदान मिळावे म्हणून विविध राजकीय पक्षांनी आपापले अर्ज सादर केले आहेत. १५ जानेवारीला निवडणुकीसाठी मतदान होणार असून त्यापूर्वी तीन चार दिवसांसाठी शिवसेनेचे दोन्ही गट आणि मनसे यांनी आपापले अर्ज केले आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात होणार असून निवडणुकीसाठी सोमवारी १५ डिसेंबरला आचारसंहिता लागू झाल्याने प्रचारासाठी सर्वच प्रमुख पक्षांनी शिवाजी पार्कवर प्रचार सभा घेण्यासाठी पालिकेकडे अर्ज केले आहेत.
मुंबई महापालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात होत असून, १५ डिसेंबरपासून आचारसंहिता लागू झाल्याने सर्व प्रमुख पक्षांनी प्रचार यंत्रणा गतिमान केली आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात जाहीर सभा घेण्यासाठी शिवाजी पार्कसारख्या मध्यवर्ती आणि ऐतिहासिक मैदानावरच सर्वांची नजर आहे.
निवडणुकीसाठी केवळ एक महिना उरला असून या कालावधीत जागा वाटप, नामनिर्देशन अर्ज भरणे, घरोघरी प्रचार यानंतर जाहीर सभा होणार आहेत, त्याकरीता राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चबाधणी सुरू केली आहे. त्यातही दादरचे शिवाजी पार्क हे मैदान मोठे असून मुंबईत मध्यवर्ती ठिकाणी आहे
शिवाजी पार्क आणि राजकीय सभा यांचे अतूट नाते आहे. विशेषतः शिवसेनेसाठी या मैदानाचे भावनिक महत्त्व मोठे आहे. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर प्रत्येक निवडणुकीत या मैदानावर सभा घेण्यासाठी दोन शिवसेना गटांमध्ये आणि इतर पक्षांमध्येही संघर्ष पाहायला मिळतो.
प्रचारासाठी ११, १२ आणि १३ जानेवारी या तारखांना सर्वाधिक मागणी असून, उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांच्याशी संपर्क साधूनही अद्याप स्पष्ट प्रतिसाद मिळालेला नाही.
शिवसेना (शिंदे) गटाने ११, १२ किंवा १३ जानेवारी यापैकी एका दिवसासाठी परवानगी मागितली आहे. शिवसेना (ठाकरे) गटाने १२ जानेवारीसाठी अर्ज दिला असून, मनसेने ११ जानेवारी रोजी प्रचारसभेसाठी अर्ज केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
या सर्व अर्जांवर मुंबई महापालिका प्रशासन निर्णय घेणार असून, तोपर्यंत शिवाजी पार्कवर सभा कोणाची? यावर मोठे राजकारण रंगणार यात शंका नाही. तसेच मनसे आणि शिवसेना (ठाकरे) यांची संयुक्त जाहीर सभा होणार का? याबाबतही राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.