राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. सुरुवातीच्या मतमोजणीत भाजपने राज्यभरात आघाडी घेतली असून, ते सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. शिवसेना शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर असून, काँग्रेसने देखील काही महत्त्वाच्या जागांवर यश मिळवले आहे. मात्र, राष्ट्रवादी (दोन्ही गट) आणि शिवसेना ठाकरे गटाला अपेक्षेप्रमाणे यश मिळालेलं दिसत नाही.
मुंबईत भाजपने जोरदार कामगिरी करत 99 जागांवर आघाडी मिळवली आहे. शिवसेना शिंदे गट 30 जागांवर पुढे आहे, तर ठाकरे गटाचे उमेदवार 63 जागांवर आघाडीवर आहेत. मनसेला 9 जागांवर आघाडी मिळाली असून, मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर होण्याची शक्यता वाढली आहे.
सध्या काही प्रभागांमध्ये धक्कादायक निकालही समोर येत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर पराभूत झाला, तर अरुण गवळी यांच्या मुली गीता आणि योगीतालाही पराभव पत्करावा लागला. मात्र, प्रभाग क्रमांक 4 मधून सामान्य पार्श्वभूमी असलेले मंगेश दत्ताराम पांगारे विजयी झाले आणि त्यांचा जत्रेसारखा जल्लोष सुरू झाला. पुण्यातही भाजपने जोरदार मुसंडी मारली असून, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गटाला मोठा पराभव बसला आहे. राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आता भाजपचा वर्चस्व पाहायला मिळत आहे.