मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणाला निर्णायक वळण मिळत आहे. मुंबई पोलिसांनी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. या नोटिसीमुळे जरांग्यांच्या आंदोलनामध्ये अडचण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आधीच मुंबईत येण्यास राज्य सरकार आणि पोलिसांनी जरांगे यांना स्पष्ट इशारा देत “मुंबईत येऊ नका” असे सांगितले होते. मात्र, लाखोंच्या संख्येने समर्थकांसह जरांगे मुंबईत दाखल झाले आणि आझाद मैदानावर उपोषण सुरू केले. या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी दिलेली नोटीस आंदोलनाच्या पुढील प्रवासावर थेट परिणाम करू शकते.
मनोज जरांगे यांचे उपोषण आज पाचव्या दिवशी पोहोचले असून दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणावर मराठा बांधवांनी तळ ठोकला आहे. कालच्या सुनावणीत हायकोर्टाने रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले होते. तरीही उपोषण सुरू असल्याने प्रशासनावर मोठे दडपण आले आहे.
आज दुपारी 3 वाजता पुन्हा या आंदोलनावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. कोर्टाचा निकाल आणि पोलिसांची नोटीस या दोन्ही गोष्टी आंदोलनाच्या भवितव्यावर निर्णायक ठरणार आहेत. कोर्टाने पूर्वीच स्पष्ट केले आहे की आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याची जबाबदारी राज्य सरकार आणि पोलिस विभागावर असेल. त्यामुळे आजची सुनावणी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून काढणारी ठरू शकते.