थोडक्यात
मुंबईतील १२५ वर्षे जुन्या एल्फिस्टन ब्रिजच्या पाडकामाला अखेर सुरुवात झाली आहे.
१२ सप्टेंबरच्या रात्रीपासून हा पूल हटवण्यास सुरुवात झाली.
या कामाला ६० दिवस चालणार आहे.
मुंबईतील 125 वर्षे जुन्या एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामाला अखेर सुरुवात झाली आहे. 12 सप्टेंबरच्या रात्रीपासून हा पूल हटवण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पोलीस बंदोबस्तात सुरू झाली आहे. हे काम तब्बल 60 दिवस चालणार असून, या दरम्यान शहरातील वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
वाहतूक मार्गात बदल
एल्फिन्स्टन ब्रिजवरून होणारी वाहतूक बंद झाल्याने पर्यायी रस्त्यांचा वापर सुरू करण्यात आला आहे. या ब्रिजमुळे पूर्व आणि पश्चिम मुंबई जोडली जात होती. सध्या करी रोड आणि परळ परिसरात जास्त गर्दी दिसून येत आहे. करी रोड चौकात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, वाहनांच्या हालचाली योग्य दिशेने वळवण्याचे काम सुरू आहे. नव्या आराखड्यानुसार, ब्रिजचं पुनर्बांधकाम डबल डेकर पद्धतीने केलं जाणार असून, हे काम पूर्ण व्हायला सुमारे दोन वर्ष लागणार आहेत.
नवीन वाहतूक मार्गदर्शक तत्त्वे
मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी दोन्ही दिशांना जाणाऱ्या वाहनांसाठी नवे नियम लागू केले आहेत. करी रोड ब्रिज सध्या वनवे करण्यात आला आहे. सकाळी 7 ते दुपारी 3 आणि दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत तो एकाच दिशेने खुला राहील. मात्र रात्री 11 नंतर ते सकाळी 7 पर्यंत दोन्ही बाजूंनी वाहने जाऊ शकतील.
परेलहून प्रभादेवी व लोअर परळकडे जाणाऱ्या वाहनांसाठी करी रोड ब्रिज वापरण्याची मुभा आहे. पूर्वेकडून पश्चिमेला जाण्यासाठी दादर पूर्वकडून टिळक ब्रिजचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परळ, भायखळा, प्रभादेवी, वरळी, कोस्टल रोड व सी लिंककडे जाणाऱ्या वाहनांसाठी चिंचपोकळी ब्रिज पर्यायी मार्ग म्हणून उपलब्ध आहे.
नो पार्किंग क्षेत्र निश्चित
वाहतूक सुरळीत राहावी म्हणून काही रस्त्यांवर नो पार्किंग नियम लागू करण्यात आले आहेत. यामध्ये ना. म. जोशी मार्ग, सेनापती बापट मार्ग, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, भवानी शंकर मार्ग, रावबहाद्दूर एस. के. बोले मार्ग तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग यांचा समावेश आहे. या सगळ्या रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी वाहन उभी करणे पूर्णतः बंदी करण्यात आली आहे.