थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी तसेच देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर परिणाम होणार असून, प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळापत्रकाची माहिती घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मध्य रेल्वेच्या मार्गावर करी रोड, चिंचपोकळी, मस्जिद आणि सँडहर्स्ट रोड या स्थानकांवर लोकल थांबा रविवारी बंद राहणार आहे. तर पश्चिम रेल्वेच्या विलेपार्ले आणि राम मंदिर या स्थानकांवरही लोकलचा थांबा नसेल. त्यामुळे या स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी स्थानकांचा वापर करावा लागणार आहे.
सीएसएमटी येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.45 या कालावधीत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल गाड्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे धीम्या मार्गावरील काही स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.
पश्चिम रेल्वे मार्गावर शांताक्रुज ते गोरेगाव या स्थानकांदरम्यान लोकल सेवा जलद मार्गावर चालवण्यात येणार आहे. तसेच बोरिवली आणि अंधेरी येथून काही लोकल हार्बर मार्गावरून गोरेगावपर्यंत धावतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
हार्बर मार्गावर पनवेलहून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 या वेळेत सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तसेच सीएसएमटीहून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या कालावधीत बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या लोकलही रद्द राहतील. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.
याशिवाय ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 या वेळेत ठाण्याकडे जाणाऱ्या आणि ठाण्याहून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 या दरम्यान धावणाऱ्या लोकल सेवा पूर्णतः बंद राहणार आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, मेगाब्लॉकदरम्यान होणाऱ्या बदलांची माहिती लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे आणि अनावश्यक गैरसोय टाळावी.