मुंबईतील वांद्रे (पूर्व) भागातील नागरिकांना कायम भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर अखेर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवीन शासकीय वसाहतीसाठी विंधन विहीर खोदण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली असून, त्यामुळे रहिवाशांना दीर्घकालीन दिलासा मिळणार आहे.
स्थानिक नागरिकांनी पाणीपुरवठ्याच्या अडचणींबाबत आमदार वरुण सरदेसाई यांच्याकडे तक्रार मांडली होती. त्यानंतर त्यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन तातडीने ५ एम.एल.डी. अतिरिक्त पाणी मिळवून दिले. मात्र हा उपाय तात्पुरता असल्याने, समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरदेसाई यांनी आपल्या आमदार स्थानिक विकासनिधीतून विंधन विहीर खोदण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाच्या अनुषंगाने वसाहतीतील सहा इमारतींसाठी विंधन विहीर खोदण्याच्या कामाचे भूमिपूजन रविवार, १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन आमदार वरुण सरदेसाई यांच्या हस्ते होणार असून, यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या उपक्रमामुळे वांद्रे पूर्वकरांना पाणीटंचाईच्या समस्येतून मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. तसेच, मुख्य पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटल्याबद्दल त्यांनी आमदार सरदेसाई यांचे आभार मानले आहेत. शिवसेना शाखाप्रमुख अरुण कांबळे यांनी वांद्रेकरांना या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.