राज्यात सध्या मुंडे कुटुंबाचा वारसदार कोण यासंदर्भात वेगवेगळी विधाने होत असताना भाजप नेत्या सारंगी महाजन यांनी मुंडे कुटुंबावर तीव्र टीका करत राजकीय वाद पुन्हा चिघळवला आहे. सारंगी महाजन या लोकशाही मराठीसोबत आज बोलत होत्या. “गोपीनाथ मुंडे साहेबांचे खरे वारसदार म्हणजे त्यांचे कार्यकर्ते, त्यांनी घडवलेले आमदार-खासदार. सध्याचे दोघे ‘स्वत:ला वारसदार’ म्हणवणाऱ्यांत त्यांच्या नखाची सरही नाही,” असा घणाघात महाजन यांनी केला.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वक्षमतेवर थेट सवाल उपस्थित करत त्यांनी आरोप केला की, “या लोकांनी फक्त गुंडागर्दी, मारामारी आणि जमिनी लाटण्याचे राजकारण केले आहे.” यावेळी महाजन यांनी नाव न घेता दोघांवर जमिनी संबंधित प्रकरणांवरून उपरोधिक हल्ला चढवला. “शंभर-शंभर एकराच्या जमिनी प्रलंबित आहेत आणि माझ्यासोबत एका एकराच्या जमिनीसाठी भांडत आहेत, कारण तिथे प्रवीण महाजन यांचं नाव आलं आहे आणि ती जमीन बीड बायपासच्या मोक्याच्या ठिकाणी आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
मुंडे साहेबांच्या कार्याचा आदर करणारे इतरही नेते आहेत, असे सांगत त्यांनी “भुजबळ साहेब, पटेल साहेब असे अनेक नेते आहेत जे गोपीनाथ मुंडे यांच्या तोडीस तोड कार्यकर्त्यांची फळी उभी करू शकतात,” असे मत व्यक्त केले. यावर आता गोपीनाथ आणि पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया काय येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे