मंत्री धनंजय मुंडे हे रात्री भगवानगडावर दाखल झाले असून त्यांनी संत भगवान बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांच्याशी रात्री चर्चा देखील केली.
याच पार्श्वभूमीवर आता महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. महंत नामदेव शास्त्री महाराज म्हणाले की, तास दोन तास आमची दोघांची चर्चा झाली. राजकीय बोललो, सामाजिक बोललो, आधात्मिक बोललो. त्यांच्या मानसिकतेचा मी आधावा घेतला. सर्व समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की, जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे आणि पक्षाचे सर्व नेते ज्याचे बालमित्र आहेत त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला वाटतं.
गोपीनाथरावांचा पुतण्या आहे. सगळ्या नेत्यांबरोबर तो राहिलेला आहे. त्याची पार्श्वभूमीवर ही गुन्हेगारीची नाही आहे. त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतायत असे मला वाटतं. पण त्यात नुकसान आमच्या सांप्रदायाचे इतकं झालं की, गेल्या 700 वर्षापासून जातीयवाद नसावा या मताचे ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि जातीयवाद नष्ट करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला. हे संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फेरलं असं मला वाटतं. भगवान गड धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठिशी आहे. जे गुन्हेगार आहेत त्यांचा शोध चालू आहे. आरोपींना मारहाण झाली ही देखील दखल घेण्यासारखी आहे. धनंजय मुंडे खंडणीवर जगणारा माणूस नाही. त्याला कायमस्वरुपी तुम्ही हेच ठरवत आहे ना. त्याची पार्श्वभूमी ती नाही आहे. जातीयवाद ज्या लोकांना माहित नाही त्यालासुद्धा जातीयवाद माहित झाला. जे संत सामाजिक सलोखा तयार करतात त्यांच्यामध्येसुद्धा तेढ निर्माण होत आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, धनंजय मुंडे गुन्हेगार नाही हे मी 100टक्के सांगू शकतो आणि गड त्याचा पाठिमागे भक्कमपणे उभा आहे. पक्षाचे जे नेते आहेत त्यांनासुद्धा याची जाणीव आहे. एकदाच अशी पाळी धनंजयवर आलेली नाही, घर फुटलं तेव्हा धनंजयने भरपूर सोसलेलं आहे. तिथून पुढे उंच उडाण घेत असताना गेले 53 दिवसांपासून त्याची मानसिक अवस्था किती आहे. जरी तो आज इथे आलेला आहे, तुम्ही त्याचा हाताला पाहा सलाईन लावलेलं आहे. किती सहन करावं एखाद्या माणसानं. समोरा - समोर लढा, समोरा समोर जय, पराजय करा. एखाद्या मुद्द्याआडून तुम्ही आघात करु नका. त्याचा फार काळ फायदा होईल असं मला वाटत नाही. भविष्यात याचे देखील वाईट परिणाम होऊ शकतात. याची प्रत्येक पक्षाच्या नेत्याने दखल घेतली पाहिजे. असे नामदेव शास्त्री यांनी म्हटले आहे.