राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी (1 जुलै) काँग्रेसचे आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आलं. सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत त्यांनी अध्यक्षांच्या टेबलजवळ जाऊन जोरदार मागणी केली. या वेळी त्यांनी असंसदीय भाषा वापरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून संपूर्ण सभागृहात प्रचंड गदारोळ निर्माण झाला. विरोधकांनी भाजप आमदार बबनराव लोणीकर आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईची जोरदार मागणी करत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान, नाना पटोले यांनी अध्यक्षांच्या टेबलजवळ जाऊन आक्रमक भाषण केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकारावर तीव्र आक्षेप घेत, अध्यक्षांचा अपमान केल्याबद्दल नाना पटोले यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. मात्र कामकाजात सातत्याने अडथळा येत असल्यामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कारवाई करत पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित केलं.
पटोले यांच्या, “मोदी तुमचे बाप असू शकतील, पण शेतकऱ्यांचे नाही,” या वादग्रस्त वक्तव्यावरून वातावरण अधिक तापलं. परिणामी, सभागृहाची कारवाई काही वेळासाठी तहकूब करण्यात आली. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे अधिवेशनाचा दुसरा दिवस गोंधळातच जात आहे.