नाशिक-मालेगाव: मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चार वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणाने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. १६ नोव्हेंबरला घडलेल्या या प्रकरणात गावातील 24 वर्षीय युवक विजय संजय खैरनार याला पोलिसांनी अटक केली असून कठोर शिक्षेची मागणी जोर धरत आहे.
या अमानुष कृत्यानंतर समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना अभिनेत्री सुरभी भावे हिनेही व्हिडिओद्वारे आपला संताप व्यक्त केला. व्हिडिओमध्येती म्हणते की,“मालेगावमधील या चिमुरडीवरील अत्याचाराची बातमी ऐकून मन सुन्न झाले आहे. वैयक्तिक वादाचा बदला म्हणून एका निरागस मुलीवर अत्याचार केल्याचे ऐकून हादरायला होते. काही माणसांच्या अवयवांचा माज वेळीच ठेचायला हवा, तर आणि तरच पुढच्या लोकांना त्याची काहीतरी दहशत राहील. आता जर का आमचे छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी त्याचा चौरंग केला असता. माझी खूप मनापासून इच्छा आहे की त्या माणसाला सुद्धा हाल हाल करून त्याचं आयुष्य संपवण्यात यावं. कारण त्याने जिवंत राहण्यात काही अर्थच नाहीये अशा आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी.”
ती पुढे म्हणाली की अशा गुन्ह्यांमध्ये न्यायप्रक्रिया अधिक वेगाने व्हावी आणि दोषींना अल्पावधीत शिक्षा मिळावी. “२४ ते ३६ तासांत निकाल लागला पाहिजे. या प्रकरणात त्वरित आणि निर्णायक कृती व्हावी, अशी तिची मागणी आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे प्रदेशभर संताप उसळला असून पीडितेला न्याय मिळावा, असे सर्व स्तरांतून आवाहन केले जात आहे.