केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज, शनिवारी गुजरातमधील गांधीनगर येथील पेठापूर येथे नव्याने बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा दहशतवादाविरोधातील भूमिका मांडली. गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, "सत्ता हाती घेतल्यापासून पंतप्रधान मोदींनी दहशतवादी हल्ल्यांना असे चोख प्रत्युत्तर दिले आहे की, जग आश्चर्यचकित झाले आहे, आणि पाकिस्तान घाबरला आहे. यावेळी, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा सारख्या दहशतवादी संघटनांचे मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आले. आम्ही अशा 9 ठिकाणांना उद्ध्वस्त केले जिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असे आणि त्यांचे लपण्याचे ठिकाण होते. आमच्या सैन्याने दहशतवाद्यांना असा धडा शिकवला की, त्यांनी पाकिस्तानच्या आत 100 किमी अंतरावर असलेल्या छावण्या उद्ध्वस्त केल्या."
"आपल्या सैन्याने पाकिस्तानच्या आत 100 किमी आत हल्ला करून दहशतवाद्यांना योग्य उत्तर दिले. सियालकोट आणि इतर दहशतवादी छावण्यांमध्ये लपलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय दहशतवादी कारवायांची योजना आखणाऱ्यांना; 'उन सब को हमारे बॉम्ब के धमाकों के गुंज ने एक स्पेशल संदेश भेजा है', जर भारतातील लोकांसोबत कोणतीही दहशतवादी कारवाई झाली तर त्याला दुपटीने जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल", असेही अमित शाह यावेळी म्हणाले.
दरम्यान, "जेव्हा पाकिस्तानने संपूर्ण पश्चिम सीमेवर हल्ला करण्याचे धाडस केले, परंतु पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, आमची हवाई संरक्षण प्रणाली इतकी परिपूर्ण झाली आहे की, एकही क्षेपणास्त्र किंवा ड्रोन भारताच्या भूमीवर पोहोचू शकले नाही. 100 हून अधिक भयानक दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर, पाकिस्तान अजूनही विचार करत होता आणि आम्ही त्यांच्या 15 हवाई तळांवर हल्ला केला, परंतु आम्ही त्यांच्या लोकांना कोणतेही नुकसान केले नाही. आम्ही त्यांची हवाई हल्ल्याची क्षमता नष्ट केली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच असे घडले आहे की, आपल्या सैन्याने पाकिस्तानच्या 100 किमी आत हल्ला केला आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. जे लोक आम्हाला अणुबॉम्ब असल्याची धमकी देत होते, त्यांना वाटले की, आम्ही घाबरू. परंतु, आपल्या सैन्य, नौदल आणि हवाई दलाने त्यांना असे चोख प्रत्युत्तर दिले आहे की, संपूर्ण जग आपल्या सैन्याच्या संयमाचे आणि पंतप्रधान मोदींच्या दृढ नेतृत्वाचे कौतुक करत आहे. मी आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्याला सलाम करतो", असेही अमित शाह यांनी नमूद केले.