सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. युवक काँग्रेसचे सरचिटणीस ओंकार हजारे (वय 32, रा. मुरारजी पेठ) यांनी रविवारी आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह स्वतःच्या कारमध्ये सुपर मार्केटजवळ आढळून आला. प्राथमिक तपासात त्यांनी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे समोर आले असून, या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. ओंकार हजारे यांनी युवकांमध्ये संघटनात्मक काम करत पक्षाला बळ दिले होते. ‘अण्णा’ नावाने ते तरुणांमध्ये ओळखले जायचे. त्यांच्या निधनामुळे सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
2019 मध्ये त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या कुटुंबात आई-वडील, पत्नी, भाऊ व भावजय आहेत. काही महिन्यांपासून ते कौटुंबिक तणावात असल्याचे सांगितले जात आहे. रविवारी त्यांच्या मेव्हण्याचे लग्न होते, मात्र त्यांना निमंत्रण न दिल्यामुळे ते अधिक नैराश्यात गेले असावेत, असे निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. सकाळपासून बेपत्ता असलेले ओंकार हजारे कारमध्ये मृत अवस्थेत आढळले. गाडीचा दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढून तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाचा तपास फौजदार चावडी पोलीस करत आहेत.
ओंकार हजारे यांच्या जाण्याने सोलापूरच्या राजकारणात शोककळा पसरली असून, अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. हजारे यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट व्हावे यासाठी पोलीस तपास सुरू असून, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.