(CIDCO Lottery 2025) नवी मुंबईत सध्या जागा आणि घरांचे दर प्रचंड वाढले असून, सर्वसामान्य नागरिकांसाठी घर घेणे आर्थिकदृष्ट्या अशक्य झाले आहे. साध्या वन बीएचके घरांची किंमत कोट्यवधींवर गेली आहे. यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष सिडकोच्या परवडणाऱ्या घरांकडे लागले आहे.
सिडकोने जून महिन्याच्या अखेरीस तब्बल 22 हजार घरांची लॉटरी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. आज बुधवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत या योजनेवर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये मागील योजनेतील शिल्लक 16 हजार घरेही समाविष्ट असणार आहेत. सिडकोने याआधी जाहीर केलेल्या 26 हजार घरांच्या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता, मात्र 10 हजार लाभार्थ्यांनी पहिला हप्ता भरला होता, ही बाब समाधानकारक मानली जात आहे.
यंदाच्या सोडतीत वाशी, जुईनगर, खारघर, तळोजा आणि द्रोणागिरी या परिसरातील घरे समाविष्ट असतील. अर्ज प्रक्रिया जूनअखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईतील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे, म्हाडा प्राधिकरण दिवाळीपूर्वी मुंबईत सुमारे 5000 घरांची लॉटरी जाहीर करणार आहे. पुढील वर्षभरात मुंबईसह राज्यात 19,497 घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, त्यापैकी 5199 घरे मुंबईत बांधली जातील. सिडको आणि म्हाडाच्या या लॉटऱ्या सर्वसामान्यांसाठी घर खरेदीची मोठी संधी ठरणार आहेत. लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.