नगरपरिषद निवडणुकांच्या निकालावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते नवनाथ बन यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ईव्हीएम आणि निकालांवर संशय व्यक्त करणाऱ्या संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना बन म्हणाले, “मशीन सेट नाही, तर संजय राऊत यांच्या डोक्यालाच फिट आली आहे. त्यामुळेच ते अशी बेजबाबदार भाषा वापरत आहेत.”
नवनाथ बन यांनी ठाकरे गटाच्या प्रचारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “संजय राऊत आजारपणाचं कारण देतात, पण उद्धव ठाकरे यांनी एक तरी सभा घेतली का? आदित्य ठाकरे यांनी प्रचारात सहभाग घेतला का? घरात बसून निवडणूक जिंकता येत नाही,” असा टोला त्यांनी लगावला. भाजपचे नेते मात्र जनतेमध्ये गेले, घरोघरी प्रचार केला, असे त्यांनी सांगितले.
“संजय राऊत स्वतःला ठाकरे गटातील सर्वात मोठे नेते समजतात. त्यांच्या नेतृत्वामुळे उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं आणि पक्षाची आजची अवस्था सगळ्यांसमोर आहे,” अशी टीकाही त्यांनी केली. सिंगल तिकीटावर नगरसेवक निवडून येणे ही लाजिरवाणी बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पैशांच्या आरोपांवर उत्तर देताना नवनाथ बन म्हणाले, “हा पैशाचा महापूर नाही, तर जनतेच्या आशीर्वादाचा महापूर आहे.” संजय राऊत यांनी जय मेहता यांच्याबाबत वक्तव्य करू नये, तसेच संदीप देशपांडे यांनी वाचलेली यादी त्यांनी नीट पाहावी, असेही त्यांनी सांगितले. काँग्रेसवर टीका करताना बन म्हणाले की, विदर्भातील १०० जागांपैकी काँग्रेस केवळ २३ ठिकाणी आघाडीवर आहे. “२३ टक्के म्हणजे अपयश आहे. बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसचा सुपडा साफ झाला असून विदर्भात ते काठावरही पास झाले नाहीत,” असा दावा त्यांनी केला.
आगामी २९ महानगरपालिका निवडणुकांमध्येही महायुतीला जनतेचा आशीर्वाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करत “मुंबईकर जनता सुज्ञ असून भाषावाद आणि प्रांतवादाला बळी पडणार नाही. मेट्रो आणि कोस्टल रोडसारखी कामं करणाऱ्यांनाच जनता साथ देईल,” असे नवनाथ बन म्हणाले.