केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीबरोबर छेडछाड झाल्याचा विषय सध्या खूप चर्चेत आहे. या प्रकरणी आता छेड काढणाऱ्या तरुणांचा तपास सुरु असून एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणावर आता राजकीय वर्तुळातूनदेखील संताप व्यक्त केला जात आहे. अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनीदेखील संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नवनीत राणा म्हणाल्या की, "रक्षाताई खडसे यांच्या मुलीसोबत छेडछाड झाली, व्हिडीओ बनवला, राज्याचे मुख्यमंत्री सक्षम आहेत. मुलगी कोणाचीही असो. पण जर असे प्रकार होत असतील तर आरोपींवर कारवाई झाली पाहिजे आणि आमचं सरकार कारवाई करण्यामध्ये सक्षम आहे. दुःख या गोष्टीचं आहे की ते एका पक्षाचे कार्यकर्ते आहेत".
पुढे त्या म्हणाल्या की, "तुम्ही राजकारण कोणत्याही पातळीवर न्या. पण असले प्रकार करू नका. हाथ जोडून विनंती करते. राजकारण गेलं खड्ड्यात. पण जर कोणी राजकीय व्यक्ती असं करत असेल तर भरचौकात आणून त्यांना फाशी द्यावी. हे खूप निंदनीय गोष्ट आहे. आमचे गृहमंत्री कडक कारवाई करणार आहेत. मुलगी कोणाचीही असो. ती राज्यात सुरक्षित आहे आणि सुरक्षित राहणार".