थोडक्यात
अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिवाळीचा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला.
राणा दाम्पत्याने आपल्या निवासस्थानासमोर अंध, अपंग आणि कुष्ठरोगी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली
या कार्यक्रमादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून संवाद साधत उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि राणा दाम्पत्याच्या सामाजिक कार्याचं अभिनंदन केलं.
अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिवाळीचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करत समाजातील वंचित घटकांना आनंदाचा भागीदार बनवलं. राणा दाम्पत्याने आपल्या निवासस्थानासमोर अंध, अपंग आणि कुष्ठरोगी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली, ज्यामुळे या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून संवाद साधत उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि राणा दाम्पत्याच्या सामाजिक कार्याचं अभिनंदन केलं.
मात्र, या प्रसंगी नवनीत राणांनी आपल्या भाषणात बच्चू कडू, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, “आज काही नौटंकी लोक बाहेर फिरून आमदारांना मारून टाका असं सांगत आहेत. तुम्ही चार वेळा आमदार होता, दोन वेळा मंत्री होता, पण तेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तुमचं पोट दुखलं नाही. आता मात्र नाटकं सुरू झाली आहेत.”
नवनीत राणांनी पुढे ठाकरे बंधूंच्या राजकारणावर निशाणा साधत म्हटलं, “परिवार एकत्र येणं ही आपली संस्कृती आहे, पण आज महाराष्ट्र पाहत आहे की दोन भाऊ फक्त सत्ता आणि खुर्चीसाठी एकत्र आले आहेत. सत्तेत आल्यानंतर पैशासाठी आणि पक्षफोडीसाठी त्यांनी हातमिळवणी केली आहे. ठाकरे परिवार आता मजबूरीचं नाव झालं आहे.”
आपल्या भाषणात नवनीत राणांनी अप्रत्यक्षपणे बच्चू कडूंवर टीका करत म्हटलं, “काही लोक आज ‘माजी’ झाले कारण त्यांनी कधी खिशात हातच घातला नाही. फक्त बोलत राहिले, काम काहीच केलं नाही. अचलपूरचे माजी आमदार करोडोंची संपत्ती बाळगतात. मी त्यांना दहा वेळा सांगितलं, तुमची संपत्ती मला द्या आणि माझी तुम्ही घ्या. पण एक शेतकऱ्याचा मुलगा त्यांना पाडून दाखवतो, कारण शेतकरी दुःखी होता.”
या भाषणाने पुन्हा एकदा राणा दाम्पत्य आणि ठाकरे गट यांच्यातील राजकीय वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे. राणा दाम्पत्याने दिवाळी सण सामाजिक बांधिलकीसोबत जोडत वंचित घटकांशी केलेली ही भेट जिथे लोकांना भावली, तिथेच नवनीत राणांच्या थेट राजकीय वक्तव्यांनी राजकीय वातावरणात नवी खळबळ उडवली आहे.