मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांनी लोकशाही मराठीशी बोलताना आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस असणार की नाही, नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जातील का, यावर सध्या राजकीय वर्तुळात संभ्रम आहे.
अजित पवार यांची भेट घेतल्याबाबत स्पष्टीकरण देताना सना मलिक म्हणाल्या की, ही भेट पूर्णपणे मतदारसंघातील प्रलंबित कामांसाठी होती. “राजकीय कोणतीही मोठी चर्चा झाली नाही. मुंबई महानगरपालिका निवडणुकांबाबत महायुतीत कुठेही फूट नाही,” असा ठाम दावा त्यांनी केला. नवाब मलिक यांच्या नावावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की, काही नेते वैयक्तिक अजेंडा आणि राजकीय रणनीती म्हणून नवाब मलिकांचे नाव पुढे करत आहेत.
“नवाब मलिक हे मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी आपलं काम करून दाखवलं आहे. त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे,” असा आरोपही सना मलिक यांनी केला. मुलगी म्हणून हे भावनिकदृष्ट्या त्रासदायक असले तरी पक्षाची शिस्त आणि भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
महायुतीबाबत निर्णय वरिष्ठ नेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे घेतील, असे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, आदेश येईपर्यंत कोणतीही अंतिम चर्चा होणार नाही. मात्र, जर महायुती झाली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. “गेल्या अनेक वर्षांपासून कार्यकर्ते मेहनत करत आहेत. स्वबळावर लढण्याचा बी-प्लानही आमच्याकडे तयार आहे,” असा इशारा सना मलिक यांनी दिला.