बीडमधील केएसके महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या साक्षी कांबळे या तरुणीने छेडछाड व ब्लॅकमेलिंगला कंटाळून धाराशिव येथील मामाच्या घरी 24 मार्च रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली असून, साक्षीच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी विविध स्तरातून होत आहे. दरम्यान, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज, मंगळवारी बीडमध्ये जाऊन साक्षी कांबळे यांच्या घरी सांत्वन पर भेट घेतली. या भेटीनंतर नीलम गोऱ्हे पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत.
याप्रकरणी साक्षीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाऊ म्हणून पत्र लिहून न्याय मागितला होता. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी साक्षीच्या आई कोयना कांबळे यांच्याशी फोनवर संवाद साधत तिला धीर दिला आणि न्यायाचे आश्वासन दिले. "मी बीड व धाराशिव जिल्ह्यांच्या पोलीस अधिक्षकांशी बोललो असून, विभागीय आयजींशीही चर्चा केली आहे. दोषींना माफ केले जाणार नाही, त्यांच्या विरोधात योग्य ती आणि कठोर कारवाई केली जाईल," असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
साक्षी कांबळे ही बीड येथील केएसके महाविद्यालयात कला शाखेच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत होती. संशयित अभिषेक कदम याच्यावर छेडछाड व ब्लॅकमेलिंगचे आरोप आहेत. पोलिसांनी कदमला अटक केली असली तरी नंतर त्याला जामीन मिळाला होता. साक्षीचे 20 एप्रिल रोजी लग्न ठरले होते, मात्र त्या काही दिवसांपूर्वीच तिने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.
साक्षीच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून न्यायाची मागणी केली होती. पत्रात आणखी दोन विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला होता. या प्रकरणाची दखल घेत महिला आयोगाने हस्तक्षेप केला असून, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, तसेच महिला आयोगाच्या सदस्य आणि शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीता चव्हाण या सतत कांबळे कुटुंबाच्या संपर्कात आहेत.
संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येईल, दोषींना कठोर शिक्षा होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला असून राज्य शासन या प्रकरणात तातडीने कारवाईस सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत.