थोडक्यात
दुकानदार जुन्या एमआरपीवर वस्तू विकत असेल तर
दुकानदाराचं जुना साठा स्वस्त दरात विकून नुकसान होईल का?
नवीन जीएसटी प्रणाली अंतर्गत फक्त 5% आणि 18% असे दोनच कर स्लॅब शिल्लक
शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जीएसटीतील (New GST Rates) सुधारणा लागू झाल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील आवश्यक असलेल्या 99 टक्के वस्तू स्वस्त झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशाला संबोधित करताना 375 हून अधिक वस्तू स्वस्त झाल्याची घोषणा केली. यामध्ये तूप, चीज, स्नॅक्स, ड्रायफ्रूट्स यांसारख्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. तर टीव्ही, एसी, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीनसारखी उपकरणंसुद्धा स्वस्त झाली आहेत. नवीन जीएसटी प्रणाली अंतर्गत आता फक्त 5% आणि 18% असे दोनच कर स्लॅब शिल्लक आहेत.
कमी केलेली एमआरपी बाजारातील प्रत्येक वस्तूवर दिसणार नाही. कारण दुकानदारांकडे वस्तूंचा जुना साठा असेल. त्यामुळे त्यावर जुनी एमआरपी दिसून येईल. सरकारने असंही स्पष्ट केलंय की वस्तूंवर कमी किंमतीचं स्टिकर लावणं बंधनकारक नाही.
जुन्या स्टॉकमधून वस्तू खरेदी केल्यावर जीएसटी कपातीचा लाभ मिळणार नाही का?
सर्व ग्राहकांना जुन्या स्टॉकमधून वस्तू खरेदी केल्या तरी, जीएसटी कपातीचा पूर्ण फायदा मिळू शकेल. असे निर्देश सरकारने दिले आहेत की 22 सप्टेंबरपासून दुकानदारांनी जीएसटी दर कपातीमुळे स्वस्त झालेल्या वस्तू विकल्या पाहिजेत. म्हणजेच दुकानातील स्टॉक नवीन असो किंवा जुना, ग्राहकांना या कपातीचा फायदा मिळेल.
कोणत्या वस्तूंच्या किंमतीवर परिणाम होणार नाही?
उत्तर- गहू, तांदूळ, पीठ, डाळी, फळे, ताज्या भाज्या, दूध, दही, ताक, मीठ, अंडी, नैसर्गिक मध आणि पिण्याचं पाणी (पॅकेज केलेल वगळून) यांच्या किमतीवर कोणताही परिणाम होणार नाही. शिवाय पेट्रोल, डिझेल, सिलेंडर, सोनं, चांदी, स्मार्टफोन आणि लॅपटॉपवरील कर समान राहतील.
दुकानदाराने जुन्या MRP वर वस्तू दिल्या तर काय करावं?
जुन्या एमआरपीवर जर दुकानदाराने वस्तू दिल्या तर 1800114000 किंवा 1915 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून तक्रार करा. तुम्ही 8800001915 या मोबाइल क्रमांकावर एसएमएस किंवा व्हॉट्स अॅप मेसेज पाठवूनही तक्रार नोंदवू शकता. तुम्ही NACH अॅपवरही तक्रार नोंदवू शकता आणि ती ट्रॅकदेखील केली जाऊ शकते. तुम्ही ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या https://consumerhelpline.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करून तिथे तक्रार दाखल करू शकता.