छत्रपती संभाजीनगरात उघडकीस आलेल्या तोतया IAS अधिकाऱ्याच्या प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. कल्पना भागवत नावाच्या महिलेने बनावट कागदपत्रांच्या आधारे शहरातील एका मोठ्या हॉटेलमध्ये तब्बल सहा महिने वास्तव्य केले होते. तपासात तिचे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील व्यक्तींशी संपर्क असल्याचे निष्पन्न झाले असून, तिच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत.
पोलिसांनी अटक केल्यानंतर तिच्या मोबाईल आणि कागदपत्रांची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात संवेदनशील माहिती आणि आर्थिक व्यवहारांचे तपशील सापडले. या महिलेने धार्मिक आणि सामाजिक कारणांच्या नावाखाली अनेकांकडून पैसे घेतल्याचेही पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांच्या यादीत आता ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे नाव आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. खासदारांनी स्वतः पुढे येऊन या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
खासदार आष्टीकर यांनी सांगितले की, त्यांची कल्पना भागवतशी काही वेळा भेट झाली होती. ती स्वतःला “रामभद्राचार्य महाराजांची शिष्या” म्हणून परिचय देत होती आणि मंदिरासाठी देणगी मागत होती. म्हणूनच त्यांनी सुरुवातीला 20 हजार रुपये दिले होते. त्यानंतरही तिने आजारपण आणि अपघाताचे कारण देत आर्थिक मदत मागितली आणि मानवी दृष्टिकोनातून काही रक्कम देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 29 ऑक्टोबर रोजी त्यांनी शेवटची रक्कम पाठवली होती, असे त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांचा तपास सध्या सुरू असून, या प्रकरणात आणखी जणांचे व्यवहार आणि संपर्क समोर येण्याची शक्यता आहे. कल्पना भागवतने बनावट ओळख वापरून हे रॅकेट कसे उभे केले आणि तिचे परदेशी संपर्क नेमके कशासाठी होते, याचा शोध घेतला जात आहे.
थोडक्यात
छत्रपती संभाजीनगरात उघडकीस आलेल्या तोतया IAS अधिकाऱ्याच्या प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत.
कल्पना भागवत नावाच्या महिलेने बनावट कागदपत्रांच्या आधारे शहरातील एका मोठ्या हॉटेलमध्ये तब्बल सहा महिने वास्तव्य केले होते.
तपासात तिचे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील व्यक्तींशी संपर्क असल्याचे निष्पन्न झाले असून, तिच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत.