ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. हे बदल थेट ग्राहक, प्रवासी आणि निवृत्तिवेतनधारकांच्या खिशावर व सेवांवर परिणाम करणारे आहेत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरचे दर निश्चित होतात. अनेक महिन्यांपासून घरगुती सिलिंडरच्या किमती स्थिर आहेत, तर व्यावसायिक सिलिंडरच्या दरात चढ-उतार झाले आहेत. आता ऑक्टोबरमध्ये दरकपात किंवा वाढ होते का, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
रेल्वेच्या आरक्षण प्रणालीतही सुधारणा होणार आहे. 1 ऑक्टोबरपासून ऑनलाइन आरक्षण सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या 15 मिनिटांत फक्त आधार पडताळणी पूर्ण केलेल्या प्रवाशांनाच तिकीट बुक करता येईल. या निर्णयामुळे तिकीट बुकिंगमध्ये पारदर्शकता येणार आहे. पेन्शन क्षेत्रातही शुल्क रचनेत बदल करण्यात आले आहेत. एनपीएस, अटल पेन्शन योजना आणि एनपीएस लाइट योजनेत PRAN कार्डसाठी नवा दर लागू होईल. ई-PRAN किटसाठी 18 रुपये तर फिजिकल कार्डसाठी 40 रुपये आकारले जातील.
डिजिटल व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या यूपीआयमध्ये नवीन नियम लागू होण्याची शक्यता आहे. फसवणूक टाळण्यासाठी काही पीअर-टू-पीअर व्यवहारांवर मर्यादा आणली जाणार आहे, अशी माहिती नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI)ने दिली आहे.
याशिवाय, ऑक्टोबर महिन्यात बँकांना एकूण 21 दिवस सुट्ट्या असतील. गांधी जयंती, दसरा आणि दिवाळी यांसारख्या मोठ्या सणांमुळे ग्राहकांना बँकिंग कामकाजाची पूर्वतयारी करावी लागणार आहे. या सर्व बदलांमुळे ऑक्टोबर महिन्यातील खर्चाचे नियोजन व दैनंदिन व्यवहार यावर मोठा परिणाम होणार आहे.