(Delhi Blast Update) लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या कार बॉम्ब स्फोटानंतर घटनास्थळी धाव घेतलेल्या फॉरेन्सिक आणि दहशतवादविरोधी तज्ज्ञांना सुरुवातीला एकच गोष्ट जाणवली. तेथे कोणतेही खड्डे (craters), शॅप्नेल्स किंवा पेलेट्स नव्हते. ही बाब सुरुवातीला तपासकर्त्यांना संभ्रमात टाकणारी ठरली. मात्र काही तासांतच एक संभाव्य स्पष्टीकरण समोर आले, जर कार हालचालीत असेल, तर स्फोटानंतर खड्डा तयार न होण्याची शक्यता असते, असे काही तज्ज्ञांनी सांगितले.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, “हा स्फोट अत्यंत ज्वलनशील रासायनिक पदार्थामुळे झाला असावा. हे उच्च दर्जाचे विस्फोटक साहित्य असण्याची शक्यता आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, अमोनियम नायट्रेट आणि RDX च्या मिश्रणाचा वापर झाला असावा, अशी प्राथमिक शंका आहे. मात्र याबाबतचा अंतिम निष्कर्ष फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच लागणार आहे.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी सोमवारी उशिरा एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली असून हा तपास राष्ट्रीय तपास संस्था (NIA) कडे हस्तांतरित होण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या तपासात पोलिसांना गुडगावमधील सलमान नावाच्या व्यक्तीपर्यंत धागा पोहोचला. या सलमानकडेच ‘HR 26 7674’ क्रमांकाची ह्युंदाई i20 गाडी नोंदणीकृत होती. मात्र सलमानने पोलिसांना सांगितले की, त्याने ही गाडी मार्च महिन्यात देवेन्द्र नावाच्या व्यक्तीला विकली होती. यानंतर पोलिसांनी वाहन नोंदणी कार्यालयाशी (RTO) संपर्क साधून गाडीच्या विक्रीसंदर्भातील पुढील माहिती मागवली.
तपासात धक्कादायक बाब समोर आली की, गाडीच्या खरेदी-विक्रीसाठी बनावट ओळखपत्रांचा वापर करण्यात आला होता, त्यापैकी एक पुलवामा येथील व्यक्तीच्या नावाने बनवलेले होते, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. या सगळ्या गुंतागुंतीत सर्वाधिक संशयास्पद गोष्ट म्हणजे या वाहनाचे अनेक वेळा मालक बदललेले होते. दहशतवादी संघटना हल्ल्यांसाठी वापरत असलेल्या गाड्यांमध्ये अशा प्रकारची मालकीची अदलाबदल वारंवार केली जाते, त्यामुळे दहशतवादी अँगलची शक्यता नाकारता येत नाही, असे तपास यंत्रणांनी म्हटले आहे.
स्फोटावेळी गाडीत किमान तीन व्यक्ती असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. त्यामुळे ही गाडी भाड्याने घेतली गेली असावी, अशीही शक्यता तपासली जात आहे. कारण, आत्मघाती हल्ल्यांमध्ये सहसा एक किंवा दोन व्यक्तींचा सहभाग असतो, असे पोलिसांनी नमूद केले. गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करत सांगितले की, घटनास्थळाच्या आसपास लावलेल्या 230 हून अधिक CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. या फुटेजमधून गाडीचा मार्ग आणि नोंदणी क्रमांक दोन्ही स्पष्ट झाले, अशी माहिती गृह मंत्रालयाकडून देण्यात आली.
तथापि, अजूनही तपास यंत्रणांसमोर अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत,
गाडीत तीन जण का होते?
गाडीचा क्रमांक बाहेरगावचा का होता?
ती गाडी खरेदी-विक्रीच्या किती व्यवहारांतून गेली?
हे सर्व प्रश्न सध्या तपासाच्या केंद्रस्थानी आहेत. एनआयए, दिल्ली पोलिस आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांचा संयुक्त तपास सुरू असून, स्फोटात वापरलेल्या पदार्थाचा आणि कारच्या प्रवासाचा सखोल अभ्यास केला जात आहे. लाल किल्ल्याजवळील या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी आहेत. सध्या परिसर सील करण्यात आला आहे आणि राष्ट्रीय राजधानीत उच्च सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.