पुणेकरांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी पुणेकरांच्या सेवेत दोन वंदे भारताच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. त्यात अजून चार वंदे भारत ट्रेनची भर पडणार असल्याने पुणेकरांची जणू लॉटरीच लागली आहे.
सध्या महाराष्ट्रामध्ये 11 महत्वाच्या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरु आहे. देशातील कानाकोपऱ्यातून लोकं पुण्यामध्ये शिकण्यासाठी आणि अर्थार्जनासाठी येत असतात. प्रवाशांचा प्रवास सुलभ आणि आरामदायी व्हावा, यासाठी पुणे शहरामध्ये पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या दोन वंदे भारत गाड्या पुणे रेल्वे स्थानकावरून सध्या धावतच आहेत. त्यात आता अजून चार गाड्यांची भर पडणार आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणिअतिरिक्त गाड्यांची मागणी पाहता रेल्वे प्रशासनाने 28 डिसेंबर 2024 मध्ये चार नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात येतील, अशी घोषणा केली होती. त्यानुसार आता पुणे ते शेगाव, पुणे ते वडोदरा, पुणे ते बेळगाव आणि पुणे ते सिकंदराबाद या मार्गांवर वंदे भारत ट्रेन चालवली जाणार आहे. मात्र या गाड्या प्रत्यक्ष रुळावर कधी येणार याबाबत प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याव्यतिरिक्त पुणे ते नागपूर या मार्गावर वंदे भारताची स्लीपर सुविधा सुरु करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे.
या नव्या चार वंदे भारत ट्रेनमुळे आता एकूण सहा वंदे भारतच्या गाड्यांचा ताफा पुणेकरांच्या सेवेसाठी असणार आहे. या ट्रेनमुळे अनेक प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. याशिवाय आरामदायी प्रवासाचा अनुभवही घेता येणार आहे. या नवीन गाड्यांमुळे शेगाव, वडोदरा, बेळगाव आणि सिकंदराबाद येथील पर्यटनक्षेत्र सुद्धा विकसित होण्यास मदत मिळणार आहे.
हेही वाचा