बहुचर्चित संतोष देशमुख हत्या प्रकरणात महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने केलेला दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या निर्णयामुळे खटल्याच्या पुढील सुनावणीसाठी मार्ग मोकळा झाला असून, आता येत्या 4 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
या प्रकरणात सर्वच आरोपींनी दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केले असून, त्यामुळे सुनावणी सतत लांबणीवर पडत आहे. याविरोधात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी ठाम युक्तिवाद सादर केला. "दोषमुक्ती अर्जाद्वारे आरोपी न्यायालयाचा वेळ वाया घालवत असून, खटल्याचे निकाल लांबवण्याचा हेतू आहे," असा युक्तिवाद त्यांनी कोर्टात केला.
उज्ज्वल निकम यांनी कोर्टात सांगितले की, विष्णू चाटे यांच्यासह इतर आरोपींनी देखील दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केले आहेत. परंतु हे अर्ज वेळेवर न करता मुद्दाम वेळ घालवण्याच्या हेतूने उशिरा दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे दोष निश्चित करून खटल्याला तातडीने सुरुवात करावी, अशी मागणीही सरकारी पक्षाकडून करण्यात आली.
दरम्यान, महादेव मुंडे हत्या प्रकरणाशी संबंधित खळबळजनक माहितीही समोर आली आहे. या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी व्यक्तीची हत्या झाल्याचा दावा विजयसिंह ऊर्फ बाळा बांगर यांनी केला आहे. त्यांनी म्हटले की, "महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याचा मुलगा सहभागी होते. या प्रकरणात कोण समोर येईल, त्याला संपवण्याचे काम त्यांच्याच गँगने केले आहे."
सध्या वाल्मिक कराड याने जामिनासाठी देखील अर्ज दाखल केला आहे. तसेच त्याच्या संपत्ती जप्तीच्या मागणीवरील निर्णय सध्या न्यायालयाने राखून ठेवला आहे. तरीही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की, खटला लांबणीवर पडणार नाही आणि तातडीने सुनावणी घेतली जाईल.
हेही वाचा