तळकोकणातील राजकारण निवडणुकीआधी चांगलेच तापले आहे. कणकवलीतील शहर विकास आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. अधिकृत शिवसेनेच्या बॅनरखाली या आघाडीच्या प्रचाराला आज औपचारिक सुरुवात झाली. या कार्यक्रमात राणेंनी शहर विकास आघाडीला मिळत असलेल्या शिवसेना-शिंदे गटाच्या पाठिंब्याची स्पष्टपणे घोषणा केली.
शहर विकास आघाडीला पाठिंबा – वैभव नाईक व निलेश राणे एकाच भूमिकेत
उद्घाटन कार्यक्रमात बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले की शहर विकास आघाडी व उमेदवार संदेश पारकर यांना शिवसेना शिंदे गटाचा ठाम पाठिंबा आहे. "ज्यांनी सहभाग घेतला आहे ते त्यांच्या स्वरूपात काम करत आहेत. आघाडी एकदिलाने पुढे जात आहे आणि सर्व उमेदवार विजयी होतील," असे ते म्हणाले. त्याचबरोबर वैभव नाईक यांच्याविरोधात बोलणाऱ्यांना उत्तर देत राणेंनी स्पष्ट सांगितले, "वैभव नाईक यांची पाठ आम्ही राखतोय. आघाडी मजबूत करण्यासाठी सर्वजण एकत्र काम करत आहेत."
रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट निशाणा “सिंधुदुर्गात युती तुटण्याचे कारण तेच!”
यानंतर आमदार निलेश राणेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. "सिंधुदुर्गात युती तुटण्याचे कारण रवींद्र चव्हाण आहेत. सिंधुदुर्गावर त्यांचा काय राग आहे हे आम्हाला अजूनही कळत नाही," असे त्यांनी आरोप केले. ते पुढे म्हणाले, "रत्नागिरीमध्ये युती होत असेल तर सिंधुदुर्गात युतीविरोधी भूमिका का? वरती आम्ही 50-50 वर तयार होतो. कणकवलीत एक-दोन सीट मिळणार हे आधीच ठरलेलं होतं. माझे फोटो काढले असते तर चाललं असतं, पण शिंदे साहेबांचे फोटो काढले हे आम्हाला सर्वात जास्त दुखलं." चव्हाण यांची राजकीय पद्धतही त्यांनी प्रश्नांकित केली. "प्रदेशाध्यक्ष सिंधुदुर्गात तीन-तीन दिवस बसतात. दोन-तीन जिल्ह्यांचं राजकारण एकाच व्यक्तीने करू नये. सिंधुदुर्गात महायुती नको, हे कारण अजूनही अस्पष्ट आहे," अशी टीका राणेंनी केली. ते म्हणाले, "राणे साहेबांनी 35 वर्षे जिल्ह्यात एकहाती दिलेला शब्द प्रत्येक कार्यकर्त्यांनी पाळला. मग त्यांच्या दिलेल्या शब्दाचा मान तुम्ही का पाडलात, हेच आम्हाला दुखतं.
जिल्हा परिषद निवडणुकांवर स्पष्ट दिशा, “राणे साहेब जे ठरवतील तेच अंतिम” जिल्हा परिषद निवडणुकांबाबत आमदार निलेश राणे यांनी भूमिकेचे स्पष्टिकरण केले. "सिंधुदुर्गात आम्ही राणेसाहेबांनी सांगेल तसेच काम करणार. ‘तू एकीही सीट लढवायची नाही, निलेश’, असा आदेश त्यांनी दिला आणि आम्ही पहिल्यापासून तीच भूमिका ठेवली," असे त्यांनी सांगितले. राणेंनी पुन्हा एकदा अधोरेखित केले की, "या भूमिकेत कुठेही तडजोड नाही. जे राणे साहेब ठरवतील तेच आम्ही पाळणार." कणकवलीतील या कार्यक्रमानंतर सिंधुदुर्गातील युती राजकारण पुन्हा एकदा तापले असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपच्या नात्यातील दुरावा अधिकच स्पष्ट होण्याची चिन्हे दिसत आहेत.