मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी वरळी कोळीवाडा येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी नितेश राणे यांनी, केंद्राप्रमाणे आपण राज्यात मुख्यमंत्री मस्त्य संपदा योजना जानेवारी 2026 मध्ये सुरु करतोय अशी मोठी घोषणा केली. या घोषणे सोबतच नितेश राणेंनी शिवसेना ठाकरे गटातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
14 सप्टेंबर रोजी आशिया कपसाठी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान सामन्यावर ठाकरे गटाकडून बऱ्याच दिवसांपासून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावर महायुतीमधून अनेक नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अशातच वरळी कोळीवाड्यात असताना भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच उद्धव ठाकरेंना खान म्हणत आणि आदित्य ठाकरे स्वत: बुरख्यात लपून उद्या मॅच बघतील असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे.
यावेळी नितेश राणे म्हणाले की, "आदित्य ठाकरे स्वत: बुरख्यात लपून उद्या मॅच बघेल. आवाज पण मॅच करेल. पाकिस्तान जिंदाबाद असे नारे तो लावेल. संजय राऊत मरीन ड्राईव्हवर तिकीटाचे ब्लॅक करताना सापडेल. तुम्ही आवाज दिला की हात वर करेल". तसेच उद्धव ठाकरेंवर टीका करत नितेश राणे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंना महापालिका देणे म्हणजे अब्दुल किंवा शेख महापौर मुंबईचा होईल. घरातील पुजा व सत्यनारायण सुद्धा करता येणार नाही." असं म्हणत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर नितेश राणेंनी घणाघात केला आहे.