राज्यात मराठा, ओबीसी आणि बंजारा आरक्षणाच्या मागण्यांमुळे राजकीय आणि सामाजिक घडामोडींना वेग आला असतानाच केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी वेगळ्या शब्दांत आपले मत मांडले. नागपूर येथे हलबा महासंघाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, “मी ब्राह्मण जातीचा आहे. आमच्या समाजाला आरक्षण नाही आणि हेच परमेश्वराने दिलेले सर्वात मोठे वरदान आहे. माणूस जात, धर्म किंवा पंथामुळे नाही तर त्याच्या गुणांमुळे आणि कार्यक्षमतेमुळे मोठा होतो.”
गडकरी म्हणाले की, उत्तर भारतातील काही राज्यांत ब्राह्मण समाजाचे महत्त्व आहे, परंतु महाराष्ट्रात मराठा समाजाचा प्रभाव अधिक आहे. “मी जातपात मानत नाही. व्यक्तीचे यश हे त्याच्या मेहनतीतून आणि शिक्षणातून घडते. समाजातील तरुणांनी शिक्षण आणि कौशल्याच्या जोरावर प्रगती साधली पाहिजे. त्यातून समाजाची आर्थिक स्थिती सुधारेल,” असेही ते म्हणाले.
याआधीही नितीन गडकरी यांनी प्रशासकीय कामकाज आणि राजकीय दबाव या विषयावर भूमिका स्पष्ट केली होती. काही नेते आणि त्यांच्या जवळच्या लोकांना कंत्राटे मिळावीत म्हणून अधिकाऱ्यांवर दबाव आणला जातो, असे त्यांनी सांगितले होते. “काम चांगले असेल तर त्याचे श्रेय मिळतेच. त्यामुळे राजकारण्यांच्या दबावाला बळी न पडता दर्जेदार आणि पारदर्शक काम केले पाहिजे,” असा संदेश त्यांनी दिला.गडकरींच्या या वक्तव्यामुळे आरक्षण आणि जातीय समीकरणांच्या चर्चेत नवे परिमाण जोडले गेले आहे.