अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी घडवून आणल्याचा दावा पुन्हा एकदा केल्याने राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट टीका केली आहे.
राहुल गांधी म्हणाले की, "एकीकडे ऑपरेशन सिंदूर सुरू असल्याचे सांगितले जाते, तर दुसरीकडे त्याचे बंद होणे जाहीर केले जाते. ट्रम्प म्हणतात की त्यांनी ऑपरेशन सिंदूर बंद केलं. याचा अर्थ काहीतरी गडबड आहे, दाल में कुछ तो काला है."
ते पुढे म्हणाले की, "परराष्ट्र धोरणावर बोलताना मला सांगावंस वाटतं की आमचं जे धोरण होतं, त्याची भाजप सरकारने पूर्णतः चिंधड्या केल्या आहेत. आज पंतप्रधान कोणतंही स्पष्ट विधान देऊ शकत नाहीत. ट्रम्प 25 वेळा म्हणाले की, त्यांनी भारत-पाक सिसफायर घडवून आणलं, पण पंतप्रधानांनी एकदाही यावर प्रतिक्रिया दिली नाही."
राहुल गांधी यांनी सवाल उपस्थित केला की, "पंतप्रधान हे सांगतील का की शस्त्रसंधी ट्रम्पमुळे झाली? नाही सांगणार. पण हेच सत्य आहे, यापासून आपण पळू शकत नाही."
त्यांनी हेही अधोरेखित केलं की, हा फक्त सिसफायरचा विषय नाही, आपल्याला संरक्षण उद्योग, ऑपरेशन सिंदूर यावरही चर्चा करायला हवी. मात्र सध्या देशाच्या संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाबाबत सरकारची भूमिका अत्यंत अस्पष्ट आणि संदेहास्पद असल्याची टीका त्यांनी केली.
या संपूर्ण प्रकरणामुळे केंद्र सरकारवर आणि विशेषतः पंतप्रधान मोदींच्या मौनावर विरोधकांनी जोरदार घणाघाती टीका सुरू केली आहे. आता सरकार यावर काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा