बर्लीन येथे झालेल्या एका परिषदेमध्ये पीयूष गोयल यांनी अमेरिकेबद्दल एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी जाहीर केले आहे की भारत कोणत्याही आंतरराष्ट्रीय व्यापार करारात घाईघाईने निर्णय घेणार नाही. बर्लिन येथे झालेल्या बर्लिन ग्लोबल डायलॉग परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, “भारत कोणत्याही डेडलाइन किंवा दबावाखाली करार करत नाही. आम्ही विश्वास, पारदर्शकता आणि दीर्घकालीन सहकार्याच्या भावनेतून व्यापार करतो.”
गोयल यांनी स्पष्ट केले की भारत आणि अमेरिकेदरम्यान चर्चेची प्रक्रिया सुरू आहे, परंतु न्याय्य आणि संतुलित करार होणे आवश्यक आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद कायम आहेत. अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर 50 टक्क्यांपर्यंत शुल्क लावले आहे, तसेच रशियाकडून तेल खरेदीवर 25 टक्के कर लागू केला आहे. तरीदेखील, भारत संवादाच्या मार्गाने तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आहे.
वाणिज्य मंत्र्यांनी सांगितले की भारत कोणत्याही देशाच्या दबावाखाली न येता आपल्या आर्थिक आणि धोरणात्मक हितसंबंधांनुसार निर्णय घेतो. त्यांनी युरोपीय देशांच्या दुटप्पी भूमिकेवर टीका करत म्हटलं की, “भारतावर कोणीही हे सांगू शकत नाही की त्याने तिसऱ्या देशाशी संबंध ठेवू नयेत, मग तो रशिया असो वा अन्य कोणी देश.”
ऊर्जा सुरक्षेबाबत बोलताना गोयल म्हणाले की, भारतासाठी स्वस्त आणि स्थिर ऊर्जा पुरवठा ही राष्ट्रीय गरज आहे. “रशियाकडून तेल खरेदी करणे हा राजकीय निर्णय नसून भारतीय जनतेच्या आणि उद्योगांच्या हितासाठी घेतलेला व्यवहारिक निर्णय आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. गोयल यांच्या या वक्तव्यांमधून भारताचा स्वाभिमानी आणि संतुलित जागतिक व्यापार दृष्टिकोन पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.