मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर आयफोन आणि अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांना ऑनलाईन साईट्सवर वेगवेगळी किंमत आकरली जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. रिक्षा किंवा कॅब बुकिंगची सेवा पुरवणाऱ्या कंपन्याही कोणत्या प्रकारचा मोबाईल वापरता त्या आधारावर ग्राहकांकडून वेगवेगळे शुल्क आकारत असल्याचा आरोप करण्यात आला. यावर आता थेट व्यवहार मंत्रालयाने या प्रकरणी संबंधित कंपन्यांकडून स्पष्टीकरण मागितले आहे. मंत्रालयाने दोन्ही कंपन्याना नोटीस जारी केली आहे.
काय आहे प्रकरण?
ग्राहक कोणता मोबाईल वापरतायत त्यावरून या दोन्ही कंपन्या एकाच प्रकारच्या सेवेसाठी वेगवेगळे भाडे आकारत असल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकारावरून केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) ने दखल घेत आणि याप्रकरणी दोन्ही कंपन्यांना नोटीस बजावली आहे.
काय म्हटलंय नोटीशीत?
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने या कंपन्यांना त्यांच्या भाडे आकारण्याची पद्धत स्पष्ट करण्यास सांगितलं आहे. तसेच कंपन्यांकडून आकरल्या जाणाऱ्या भाड्यासंबंधी पारदर्शकता आणि निष्पक्षता राखली जावी यासाठी मंत्रालयाने सविस्तर उत्तर मागतलं आहे.
उबरने आरोप फेटाळले
सोशल मीडियावर आरोप झाल्यानंतर उबरने सर्व आरोप फेटाळले होते. तसेच ग्राहक कुठल्या प्रकारचा फोन वापरतात त्यावरून भाडे आकारत नसल्याचे स्पष्ट केलं. पीक अप पॉइंट्स आणि पोहचण्यासाठी लागणारा वेळ (ETA) ते ड्रॉप ऑफ पॉइंट यावर भाड्याची आकारणी अवलंबून असल्याचं उबरने स्पष्ट केलं होतं.