थोडक्यात
आमदार संग्राम जगताप यांना नोटीस देऊन काही होणार नाही,
पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीयं.
खासदार सुप्रिया सुळे यांनी जगताप यांना घेरलंय
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांना नोटीस देऊन काहीही होणार नाही, त्यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीयं. दरम्यान, काही दिवसांपासून आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादाची भूमिका घेतल्याने त्यांचे विधाने समोर येत आहेत. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना समज दिली होती. मात्र, आता त्यांना पक्षाच्यावतीने नोटीसच धाडण्यात आलीयं. या नोटीशीवरुन खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी जगताप यांना घेरलंय. त्या नागपुरात माध्यमांशी बोलत होत्या.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमदार संग्राम जगताप यांना नूसत्या नोटीस देऊन काही होणार नाही, त्यांची पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे, जो व्यक्ती महाराष्ट्राच्या संविधान विरोधात काम करत असेल अशा व्यक्तीवर स्ट्रॉंग ॲक्शन झाली पाहिजे. हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने चालला पाहिजे, असं सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय.
सोलापुरात आयोजित एका कार्यक्रमात आमदार संग्राम जगताप यांनी दिवाळी सणाची खरेदी फक्त हिंदू व्यक्तीकडूनच करा, असं विधान केलं. त्यांच्या या विधानाची राज्यभर चर्चा सुरु असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आमदार जगताप यांची भूमिका पक्षाची नसल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर आमदार जगताप यांना पक्षाच्यावतीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचंही पवारांनी सांगितलं होतं.
अजित पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आमदार संग्राम जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावलीयं. या मुद्द्यावरुन आता सुप्रिया सुळे यांनीही तोंडसुख घेतल्याचं दिसून येत आहे. संग्राम जगताप यांची थेट पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणीच सुळे यांनी केली आहे.
सोलापूर येथे एका कार्यक्रमात बोलताना दीपावली सणाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकांनी खरेदी फक्त हिंदू लोकांच्याच दुकानातून करावी. आपल्या दीपावली खरेदीचा नफा केवळ हिंदू लोकांनाच मिळायला हवा. सध्या हिंदू मंदिरात अथवा हिंदूंवर होणारे हल्ले हे मशिदीमधून घडत असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर त्यांच्या या विधानाची राज्यभरात चर्चा सुरु आहे.
दरम्यान, आमदार जगताप यांच्या या विधानाची राज्यभरात चर्चा सुरु असतानाच त्यांना नोटीस धाडण्याबाबत अजित पवारांनी कालच स्पष्ट केलं. त्यानंतर आज तटकरे यांनी आमदार जगताप यांना नोटीस धाडलीयं. या नोटीशीनंतर आमदार जगताप आपली भूमिका बदलणार का? नोटीशीवर आमदार जगताप काय उत्तर देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.