"ऑपरेशन सिंदूर"नंतर देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरलेल्या भारताच्या अचूक लष्करी कारवाईबाबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ठाम आणि परखड भूमिका मांडली. IIT मद्रासच्या 62 व्या पदवीप्रदान समारंभात बोलताना त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'मागील रणनीती, अचूकतेने लक्ष्य केलेले दहशतवादी तळ आणि भारताच्या प्रगत संरक्षण तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले.
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पाकिस्तान प्रशिक्षित दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचे प्राण गेले होते. यानंतर भारताने 7 मेच्या पहाटे 1 वाजून 23 मिनिटांनी केवळ 23 मिनिटांत पाकिस्तानमध्ये विविध भागांतील 9 दहशतवादी केंद्रांवर अचूक हल्ले करत ऑपरेशन सिंदूर पार पाडले. या कारवाईत 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला.
अजित डोवाल म्हणाले की, "ही कारवाई इतकी अचूक होती की आम्हाला कुठे कोण आहे हे ठावूक होतं. प्रत्येक लक्ष्यावर अचूक प्रहार झाला. पण काही विदेशी माध्यमांनी खोटी माहिती पसरवली की पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. मग मी त्यांना विचारतो, भारतात झालेल्या नुकसानीचा एकही फोटो दाखवा, एकही काच फुटलेली दाखवा!"
डोवाल यांच्या या विधानातून भारताच्या कारवाईची प्रभावीता स्पष्ट होते. त्यांनी पुढे सांगितले की, "ज्या इमेजेस आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दाखवल्या त्या पाकिस्तानातील 13 हवाईतळांच्या आधी आणि नंतरच्या इमेजेस होत्या, सर्गोधा, रहिम यार खान, चकला यांसारख्या ठिकाणांवरील. पण भारतात झालेल्या नुकसानीचा एकही फोटो किंवा पुरावा कोणीही दाखवू शकत नाही."
डोवाल यांनी यावेळी भारताच्या लष्करी प्रगतीबरोबरच आर्थिक आणि तांत्रिक क्षमतेवरही भर दिला. त्यांनी सांगितले की भारताने केवळ 2.5 वर्षांत देशी तंत्रज्ञानाच्या आधारे 5G विकसित केले, जे चीनला 12 वर्षे आणि 300 अब्ज डॉलर खर्च करून जमले.
ही सर्व वक्तव्ये केवळ भारताच्या सामर्थ्याचे प्रदर्शन नाही, तर नव्या भारताच्या आत्मविश्वासाचेही प्रतीक आहे. विदेशी माध्यमांना थेट प्रश्न विचारून डोवाल यांनी दाखवून दिले की, भारत आता कोणत्याही चुकीच्या प्रतिमेसमोर शांत राहणार नाही, तर पुराव्याच्या आधारे उत्तर देईल.
हेही वाचा