महायुती सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) गटाचे नेते छगन भुजबळ यांना स्थान न मिळाल्याने ते नाराज झाल्याचं त्यांनी उघड उघड जाहीर केलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली आहे. राज्यातील ओबीसी नेत्यांची मुंबईत छगन भुजबळांसोबत बैठक संपन्न झाली. दिड तास भुजबळांची ओबीसी नेत्यांसोबत बैठक पार पडली. मंत्रिमंडळातून भुजबळांना वगळल्यानं ओबीसी नेते, कार्यकर्ते आणि समाज नाराज असल्याचं चित्र आहे. त्यामुळे ओबीसींशी चर्चा करुनच मी अंतिम निर्णय घेईन, असं स्पष्टीकरण छगन भुजबळांनी दिलं.
काय म्हणाले छगन भुजबळ?
सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी समाज त्रस्त झाल्याची माहिती भुजबळांनी दिली आहे. चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार असल्याचं छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
भुजबळांना मंत्रिमंडळात घ्या, अन्यथा... प्रकाश शेंडगे यांचा थेट इशारा
बिनकामाचे मंत्रिमंडळात घेतले, कामाचा नेता बाहेर काढला असल्याचं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी महायुतीवर घणाघात केला आहे. छगन भुजबळांना मंत्रिपद न दिल्यानं OBC समाज नाराज, भुजबळांना मंत्रिमंडळात घ्या, अन्यथा संघर्ष, प्रकाश शेंडगे यांनी थेट इशारा दिला आहे. भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान द्या. जरांगेंचं आंदोलन सुरु झाल्यानंतर ओबीसींचं आंदोलन पाहायला मिळेल असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी सरकारला दिला आहे. भुजबळांशी चर्चा करण्याआधी शेंडगेंच्या उपस्थितीमध्ये 5 तास बैठक पार पडली. या बैठकीत ओबीसींच्या मागण्यांबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यामुळे नाराजी असून यावरही चर्चा करण्यात आली आहे.