मराठा आरक्षणाच्या प्रश्नाने राज्याचं राजकारण तापलेलं असतानाच ओबीसी नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत मनोज जरांगे पाटील यांच्यावर तीव्र टीका केली आहे. आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाचा आज चौथा दिवस असताना, मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. जवळपास दोन तास चाललेल्या या चर्चेनंतर भुजबळांनी पत्रकार परिषद घेत सरळ संदेश दिला. “मराठा आणि कुणबी एक आहेत, हा मूर्खपणा आहे. याबाबत उच्च न्यायालयानेही स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.”
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसींची वज्रमूठ
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक भूमिकेत आहे. त्यांची प्रमुख मागणी म्हणजे ओबीसी प्रवर्गातूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं. पण ओबीसी नेत्यांनी या मागणीला तीव्र विरोध दर्शवत आपली वज्रमूठ अधिक घट्ट केली आहे. भुजबळांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांनी स्पष्ट केलं की, ओबीसींच्या हक्कांवर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही.
भुजबळांचा जरांगेंवर थेट निशाणा
बैठकीनंतर बोलताना छगन भुजबळांनी जरांगे पाटलांवर थेट निशाणा साधला. “आम्ही सर्व ओबीसी नेते एकत्र आलो आहोत. तायवाडे उपोषणावर असल्याने येऊ शकले नाहीत, आमदार गोपीचंद पडळकर बाहेरगावी असल्याने तेही उपस्थित राहिले नाहीत. मात्र सर्वानुमते ठरलं की, मराठा आणि कुणबी एक आहेत ही जी थाप पसरवली जाते, तो निव्वळ मूर्खपणा आहे. आणि हे मत फक्त आमचं नाही, उच्च न्यायालयानेही नोंदवलं आहे,” अशी ठाम भूमिका भुजबळांनी मांडली.
संघर्ष आणखी तीव्र होणार?
एका बाजूला मराठा समाजाची आक्रमक चळवळ, तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांची घट्ट झालेली वज्रमूठ – या दोन्ही गोष्टींमुळे सरकारसमोरचे आव्हान अधिक गंभीर बनले आहे. भुजबळांच्या वक्तव्याने संघर्षाला नवं वळण मिळालं असून, पुढील काही दिवसांत या प्रश्नाचं तापमान आणखी चढणार हे निश्चित आहे.