ओबीसी आरक्षण चळवळीशी संबंधित नेते लक्ष्मण हाके यांचा एक कथित ऑडिओ कॉल सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ऑडिओमध्ये आंदोलनासाठी आर्थिक सहाय्य दिल्याचा संवाद असल्याचे म्हटले जात असून, चर्चेत हाके यांनी ड्रायव्हरचा यूपीआय क्रमांक मागितल्याचा उल्लेख आहे.
ही ऑडिओ क्लिप समोर आल्यापासून राजकीय वर्तुळात आणि जनतेत यावर जोरदार चर्चा रंगली आहे. ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बाब उघड झाल्याचा दावा होत असून, या प्रकरणाने राज्यातील घडामोडींना नवे वळण दिले आहे.
या संभाषणात सुरुवातीला एका तरुणाने हाके यांचे समाजासाठी केलेले काम कौतुकास्पद असल्याचे सांगून आर्थिक मदत देण्याची तयारी दर्शवली. त्यावर हाके यांनी प्रत्यक्ष भेटल्यावर मदत द्यावी असे सांगितले. मात्र, त्या व्यक्तीने वारंवार ऑनलाईन व्यवहार करण्याची तयारी दर्शवल्यानंतर हाके यांनी आपल्या सहकाऱ्याचा यूपीआय नंबर देण्याचे संभाषणात ऐकायला मिळते.
या ऑडिओ कॉलच्या अखेरीस त्या व्यक्तीने हाके यांच्यावर तीव्र शब्दांत आरोप करत टीका केली. यात "तुम्ही समाजासाठी काम करताय, पण लोकांकडून पैसे घेताय, सुपाऱ्या घेता" असे वक्तव्य करत हाके यांच्यावर थेट हल्ला केल्याचे ऐकायला मिळते.
तथापि, या ऑडिओ क्लिपची सत्यता अद्याप अधिकृतरीत्या पुष्टी झालेली नाही. हा कॉल खरा की खोटा, याबाबत नेमकी माहिती पुढे आलेली नाही. तरीही या घटनेमुळे ओबीसी आंदोलन आणि त्यासंबंधित राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाले असून राज्यातील राजकारणात आणि सोशल मीडियावर आता यावर चांगलीच चर्चा रंगली आहे.लक्ष्मण हाके यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे सुद्धा महत्वाचे ठरेल.