मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन छेडणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा सक्रिय झाले असून त्यांनी पंढरपूर येथे केलेल्या भाषणातून खळबळजनक आरोप केले आहेत. “मला मारायला उठले आहेत, माझ्या हत्येच्या सुपाऱ्या द्यायला लागले आहेत,” असा गंभीर दावा त्यांनी केला. मात्र, “मायबाप जनता माझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत मला कोणाची भीती नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
पंढरपूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “सरकारच्या तळी उचलणारे लोक सांगतात की आता माझ्यासोबत कोणी नाही. पण एकाच गावात येऊन बघा, समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत, चांगल्या सरकारी नोकऱ्या मिळवत आहेत. मी त्यांच्यासाठी लढलो, त्यामुळे समाज माझ्या मागे उभा राहणारच.” त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण झाला.
आपल्या विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, “मी जवळचा एकही माणूस मोठा होऊ दिला नाही म्हणून माझ्यावर आरोप केले जात आहेत. समाजाच्या जीवावर मोठे व्हायचे नाही. मला गोरगरीबांच्या लेकरांना मोठं करायचं आहे. समाजाच्या नावावर दुकानदारी करणाऱ्यांना मोठे करण्यासाठी मी लढत नाही.” ज्यांना वैयक्तिक फायद्यासाठी जवळ राहायचे आहे, त्यांनी माझ्यापासून दूर राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “दोन वर्षांत ५८ लाख नोंदी दिल्या आहेत. सातारा संस्थानाचा आदेश निघणार आहे; अन्यथा आम्ही घोडे लावू.” त्यांनी आपल्या विरोधकांवर समाज फोडण्याचा आरोप करत, “जवळचे लोक फोडून काहीही वदवून घेतात,” अशी टीका केली. तसेच, “आपली जात बदनाम करू नका. शेवटी मदतीला जातच येते,” असे आवाहन त्यांनी केले.
तरुणांना संदेश देताना त्यांनी व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. “आरक्षणाचा लाभ घ्या, आरक्षण घ्या लाजू नका,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांना हक्कासाठी उभे राहण्याचे आवाहन केले. जरांगे पाटील पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे संकेत त्यांच्या भाषणातून मिळाले. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा आंदोलन तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.