शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांनी दिनांक 8 जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा उद्देश सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष वेधणे हाच असून, आंदोलनाला विविध पक्षांमधून पाठिंबा मिळताना दिसून आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य संजय खोडके आणि अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी थेट उपोषण स्थळी भेट देत बच्चू कडू यांच्याशी संवाद साधला. संजय खोडके यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून देखील बच्चू कडू यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यात आली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "अमरावती जिल्ह्याला अशा लढवय्या नेत्यांची अत्यंत गरज आहे. म्हणूनच बच्चूभाऊंनी आपली प्रकृती सांभाळत लढा पुढे चालू ठेवावा. आंदोलनाचा मार्ग योग्य आहे, पण अन्नत्याग आरोग्यासाठी हानिकारक आहे." यावेळी त्यांनी उपोषण मागे घेण्याची विनंतीही केली.
या भेटीदरम्यान आमदार सुलभा खोडके यांनी देखील आपले मत मांडले. त्यांनी सांगितले की, "शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सुरु असलेल्या या लढ्यात आम्ही पूर्णपणे बच्चूभाऊंच्या सोबत आहोत. मात्र, आंदोलनाचा मार्ग सत्तास्थानांवर दडपशाही करण्याचा असावा. आपण मंत्रालय आणि शासन दरबारी आंदोलन उभं करून मागण्या मान्य करून घ्याव्यात. उपोषण सुटले तरी आंदोलन संपणार नाही, पण बच्चूभाऊंनी उपोषण थांबवावे."
याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी देखील उपोषणस्थळी भेट दिली. त्यांनी भावनिक शब्दात बच्चू कडू यांच्याप्रती आपली कृतज्ञता आणि पाठिंबा व्यक्त केला. "बच्चू भाऊ, तुम्ही चळवळीतून आलेले आहात. अशा चळवळीतील कार्यकर्त्याने असा हातबल होऊ नये. सरकारला आपण हातबल करायला हवं, स्वतः नाही. मी परवाच एका सत्ताधाऱ्याला आव्हान दिलं आणि आज इथे आलो आहे – तुम्हाला नतमस्तक व्हायला," अशा शब्दांत त्यांनी बच्चू कडू यांचं कौतुक केलं.
महाजन यांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका करत सांगितले की, "ही गेंड्याच्या कातडीची सरकार आहे. यांना शेतकऱ्यांचे दु:ख जाणवत नाही. हलक्या लोकांनी सत्तेवर कब्जा केला आहे. म्हणूनच अशा सरकारला लढा देण्यासाठी तुमच्यासारख्या लढवय्या कार्यकर्त्यांची गरज आहे."
ते पुढे म्हणाले, "तुम्ही अपंगांसाठी जे काम केलं ते फार दुर्मिळ आहे. अशा नेत्याने उपोषण करून जीवाला त्रास देऊ नये. तुम्ही मंत्री घरात कोंडा आणि त्यांना उपोषण करायला लावा, मी तुमच्या सोबत येईन. मी विनंती करतो, उपोषण मागे घ्या आणि ताकदीनं पुन्हा मैदानात उतरा."
या सर्व घडामोडींमुळे बच्चू कडू यांचं आंदोलन आता केवळ प्रहार जनशक्तीपुरतं मर्यादित न राहता, राज्यभरातून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचा पाठिंबा मिळवू लागलं आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरलेला हा लढा आता अधिक प्रभावी ठरण्याची चिन्हं दिसत आहेत.