राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात पक्षाचे संस्थापक व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रेरणादायी आणि स्पष्ट भाषण करत कार्यकर्त्यांना नवी दिशा दिली. शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्याचा निर्णय त्यांनी अशा ध्येयाने घेतला की, सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला राज्य चालवण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यांनी दिवंगत आर. आर. पाटील यांचा विशेष उल्लेख करत सांगितले की, सांगली येथील सभेत आरआर आबांचे कर्तृत्व मला जाणवले. अगदी सामान्य पार्श्वभूमी असलेल्या या नेत्याने गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री अशा जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे पार पाडल्या.” त्यातून हे अधोरेखित होते की, राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे.
महिला सक्षमीकरणाबाबत स्पष्ट भूमिका घेत शरद पवार म्हणाले की, “महिलांना जबाबदारी दिली तर त्या ती यशस्वीपणे पार पाडतात. पहेलगाम हल्ल्यानंतर मोहिमेची जबाबदारी दोन महिलांनी पार पाडली याचा अभिमान आहे.” त्यांनी जाहीर केले की, आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये 50% जागा महिलांना दिल्या जातील. ही भूमिका प्रत्यक्षात आणणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पुढे भाषणात पवार म्हणाले की, “केंद्र सरकारमध्ये काम करत असताना आम्ही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या, आणि विरोधी पक्षात असतानाही आमची भूमिका ठाम राहिली.” उद्योग, शेती, व्यवसाय, सामाजिक सेवा अशा सर्व क्षेत्रांत राष्ट्रवादी काँग्रेसने ठोस कार्य केल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “अनेकजण इतर पक्षात गेले, पण जे राहिले ते निष्ठावान, प्रामाणिक कार्यकर्ते होते. आमच्यावर संकटं आली, अनेकांनी साथ सोडली, तरी आम्ही आमचा पक्ष पुन्हा उभा केला.” त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना उद्देशून आवाहन केलं की, “कोण आला, कोण गेला याकडे दुर्लक्ष करा. प्रामाणिकपणे पक्षासाठी काम करत राहा. सत्ता गेली याची चिंता करू नका – ती पुन्हा येईल.” असे प्रतिपादन त्यांनी केले.
देशाचे नेतृत्व आणि आंतरराष्ट्रीय सुसंवादाबाबत चिंता
भारताच्या जागतिक संबंधांवर भाष्य करत त्यांनी सांगितले की, “नेहरूंच्या नेतृत्वाखाली भारताने सर्व देशांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका घेतली होती. मात्र आज आपल्याला साथ देणारे देश कमी झाले आहेत. भारत आणि इतर देशांमधील सुसंवाद कमी होतो आहे, हे चिंतेचं कारण आहे. देशाच्या मुख्य नेत्यांनी संवाद साधण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. देशहिताचे निर्णय घेताना राजकारण आणू नका. विविध जाती, धर्म, समाज यांच्या विचाराने निर्णय घेतले तरच देश प्रगतीच्या दिशेने जाईल.” त्यांनी पुढे नमूद केलं की, “राजकारणाची भूमिका सर्वसमावेशक झाली पाहिजे, तेव्हाच देश विकासाच्या मार्गावर जाईल.”
नव्या नेतृत्वाला प्रोत्साहन
शरद पवार यांनी पक्षातील तरुण, कार्यशील कार्यकर्त्यांना पुढे आणण्याचा संकल्प व्यक्त केला. “प्रत्येक तालुका आणि जिल्ह्यातील होतकरू, हुशार तरुणांना संधी दिली पाहिजे. आमच्याकडे सक्षम नेतृत्व आहे, ते पुढे आणण्याचे काम आपले आहे,” असे ते म्हणाले. शरद पवार यांचे हे भाषण केवळ राजकीय दृष्टिकोन नाही, तर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि आत्मविश्वास निर्माण करणारे ठरले. त्यांच्या अनुभवातून मिळालेले हे मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायक असेल.